सोमवारच्या पाटणकर गटाच्या बैठकीमुळे तालुक्यात राजकीय भूकंपाची शक्यता!
पाटण तालुक्यातील राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडवणाऱ्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. येत्या सोमवार, दि. २६ मे २०२५ रोजी पाटण येथील श्रीराम मंदिरात दुपारी १२:३० वाजता पाटणकर गटाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ही बैठक केवळ संघटनात्मक नसेल तर आगामी राजकीय दिशा व धोरणे ठरविणारी निर्णायक बैठक ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही माजी व विद्यमान पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पाटणच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे कारण या बैठकीस पाटणकर गटाचे सर्वेसर्वा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, तसेच युवा नेतृत्व याज्ञसेन पाटणकर यांची उपस्थिती राहणार आहे.
माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, “ही बैठक अत्यंत निर्णायक असून राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून नवे संकेत देणारी ठरेल. त्यामुळे गटातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.”
या बैठकीला संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत.
पाटणकर गट भाजपच्या दिशेने ?
गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पाटणकर गट भाजपमध्ये सामील होणार का?, काही नवे चेहरे भाजपमध्ये प्रवेश करणार का?, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व चर्चांवर पडदा उघडण्याची शक्यता सोमवारच्या बैठकीत असल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे.
राजकीय वाऱ्यांची दिशा बदलतेय... आता पाटण .च्या काठावर नवा खेळ रंगणार का ?
सोमवारच्या बैठकीनंतर पाटणच्या राजकारणात नवे वळण येणार, हे निश्चित मानले जात आहे!