तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा तसेच शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. ४ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक करांडे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना व माजी विद्यार्थ्यांना कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
१९६९ साली थोर देशभक्त बी. एन. उर्फ काकासाहेब चव्हाण आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रेरणेतून काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाची स्थापना झाली. या महाविद्यालयाने हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत त्यांचे जीवन उजळवले आहे. या महाविद्यालयाला प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उज्वल परंपरा लाभली आहे.
या स्नेहमेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळा व नॅक प्रोजेक्ट रूमचे उद्घाटन, जे माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहकार्याने साकार झाले आहे. महाविद्यालयास नुकतीच नॅक समितीकडून B++ ग्रेड (२.७७ गुण) प्राप्त झाली असून, हा यशाचा आलेख माजी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य झाला आहे.
या मेळाव्याला प्राचार्य डॉ. उषादेवी साळुंखे (प्रभारी प्राचार्या), राजाभाऊ माने (अध्यक्ष, माजी विद्यार्थी मंडळ) व कार्यकारिणी सदस्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. जुने मित्र-मैत्रिणी, गुरुजन यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देणारा आणि उत्साहवर्धक असा हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरणार आहे.