पिंपरी चिंचवडच्या शंभर शाळांमध्ये 'एक तास कवितेचा – कवी तुमच्या भेटीला' उपक्रम उत्साहात संपन्न


पिंपरी चिंचवड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शंभर प्राथमिक शाळांमध्ये ‘नक्षत्राचं देणं काव्यमंच’ या संस्थेच्या वतीने “एक तास कवितेचा – कवी तुमच्या भेटीला” हा उपक्रम वर्षभर यशस्वीरित्या राबविण्यात आला. मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या आवाहनानुसार दर शनिवारी 'दप्तरा विना शाळा' या उपक्रमांतर्गत हा कवितामय उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत कवी वादळकार प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे यांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये कवितेची गोडी निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले. कोणतेही मानधन न घेता विद्यार्थ्यांमध्ये कवितेची आवड निर्माण व्हावी, ही भूमिका ठेवून वर्षभर हा उपक्रम राबवण्यात आला. तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचवण्यात यश आले.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेने घेतलेला हा अभिनव उपक्रम संपूर्ण शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्तीचे धाडस, निरीक्षणशक्ती, भाषिक सौंदर्याची जाण, आणि अभ्यासात रस निर्माण झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली.

पुढील टप्प्यात प्रत्येक शाळेतून दोन बालकविंची निवड करून "बालकाव्य संमेलन" आयोजित करण्यात येणार असून, त्यांचा बालकाव्यसंग्रह प्रसिद्ध करण्याचा मनोदयही प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी झेंडा, आई-वडील, पर्यावरण, प्राणी-पक्षी, माणुसकी आदी विषयांवर कविता सादर केल्या. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कविता लिहून सादर केल्या, तर काही शिक्षकांनीही सहभाग घेत कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रतिभा फुलवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाळांमध्ये "बालकाव्यमंच" स्थापन करण्याचेही आवाहन करण्यात आले.

पिं.चिं. मनपाच्या सर्व आठही प्रभागांतील शाळांमध्ये – भोसरी, आकुर्डी, निगडी, चिंचवड, काळेवाडी, मोशी, वडमुखवाडी, फुगेवाडी, सांगवी, चिखली, थेरगाव, रहाटणी, कासारवाडी, पिंपळे सौदागर, पुनावळे इत्यादी भागांतील मराठी, इंग्रजी, उर्दू शाळांमध्ये सकाळी आणि दुपारी, शाळेच्या वेळेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला.

संस्थेने यापूर्वी शिक्षकांसाठीही कवी संमेलनाचे आयोजन केले होते. लवकरच नव्या संमेलनाचे नियोजन करत असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. या उपक्रमातून उद्याचे कवी आणि लेखक घडतील, असा विश्वास संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केला.