सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत 'पी. डी. पाटील पॅनल'चा दणदणीत विजय – ८ हजार मताधिक्याने यश


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'पी. डी. पाटील पॅनल'ने मोठा विजय संपादन केला आहे. दोन्ही फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर हे पॅनल तब्बल ८,००० मतांच्या आघाडीने विजयी ठरले आहे.

या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सरासरी ७,५०० मते मिळाली, तर पी. डी. पाटील पॅनलने सरासरी १५,५०० मते मिळवून स्पष्ट बहुमताने आपली ताकद दाखवून दिली. निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम आणि भाजप युवा मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलला केवळ २,२०० मते मिळाली आहेत.

ही निवडणूक परिसरात चांगलीच लक्षवेधी ठरली होती. राजकीय वजन असलेल्या या निवडणुकीत पी. डी. पाटील पॅनलचा विजय हा त्यांच्या संघटनशक्तीचे आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतिबिंब मानला जात आहे.

या निकालाने सह्याद्री परिसरात पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.