नागपूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा: दिनांक ३० मार्च २०२५ रोजी नागपूर येथे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात कवी, लेखक सत्यवान मंडलिक यांच्या 'म्हातोबाचा माळ' या ग्रामीण कथासंग्रहास प्रतिष्ठित 'वामन होवाळ' राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य मा. डॉ. राजेश गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या समारंभाला आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, त्रिपुराचे कुलगुरू डॉ. प्रकाश करमाडकर, डॉ. जगन कराडे, डॉ. रवींद्र तिरपुडे, ज्येष्ठ साहित्यिक विलास तायडे, नाटककार सुनील रामटेके, चंद्रपूरचे ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर बन्सोड, ॲड. भूपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपकुमार खोब्रागडे होते.
सत्यवान मंडलिक यांनी कथा, कविता, ललित व वैचारिक लेखन अशा विविध साहित्य प्रकारांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या शैलीदार लेखणीमुळे साहित्य क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. यापूर्वी साहित्य गौरव, कालिदास सन्मान, साहित्य भूषण, समाज भूषण, स्वदेशी भारत सन्मान, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा स्व. राजाराम डाकवे पुरस्कार यांसारख्या अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या उल्लेखनीय सन्मानाबद्दल सत्यवान मंडलिक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.