बहुजनांचे बहुआयामी व्यक्तीमत्व - स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई


विशेष लेख | संतोष बंडू कदम :
महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या आज ४२ व्या पुण्यतिथी सोहळा निमित्ताने त्यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकणारा लेख….

महाराष्ट्र राज्याच्या नकाशात पाटण तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षराने कोरणारे... पाटण तालुक्याच्या विकासाबरोबर महाराष्ट्र राज्याच्या जडण-घडणीमध्ये विकासाचा महामेरू म्हणून ज्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो ते म्हणजे कर्तव्यदक्ष, तडफदार, बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे स्व. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे नांव आजही आवर्जून घेतले जाते …. 

 जिच्या हाती पाळण्याची दोरी…!

 तिच जगाचा उद्धार करी…!! 

या उक्तीप्रमाणे आई दरुबाई पोटी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा जन्म 10 मार्च 1910 रोजी पाटण तालुक्यातील विहे या गावी झाला. त्यांचे मूळ नाव दौलत परंतु बालपणी त्यांना बाळू या नावाने ओळखले जात होते. त्यामुळे त्यांना पुढे बाळासाहेब या नावाने ओळखले जाऊ लागले. म्हणतात ना बालपणीचा काळ हा सुखाचा असतो... पण लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या बाबतीत असे घडलेच नाही. अवघ्या दीड वर्षाचे असताना आई दरुबाई या देवा घरी गेल्या... आणि लोकनेते बाळासाहेब देसाई हे आईविना पोरके झाले... व त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशी पुतळाबाई यांनी केला. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघ्या आठ वर्षाचे असताना लोकनेते साहेबांना शिक्षणासाठी आपले घर सोडावे लागले. शिक्षणासाठी त्यांना पाटण, कराड या ठिकाणी त्यांनी काही वेळा उपाशी राहून चणे- फुटाणे खाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. व सातवी नंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले. व शिक्षणासाठी त्यांनी संकटांना न जुमानता जेवणासाठी वार लावले. व अन्नाअभावी वर्गात चक्कर येवून पडणाऱ्या लोकनेते साहेबांनी बारा वर्षाच्या खडतर तपानंतर त्यांनी 1937 साली बी. ए. एल. एल. बी. वकिलीची प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली.

काही काळ लोकनेते साहेबांनी वकिलीचा व्यवसाय कराड व पाटण या ठिकाणी सुरू केला. मध्यम बांधा असलेले, पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट किंवा जाकेट, पायात कोल्हापुरी चप्पल असा वेश असलेले लोकनेते साहेब होते. पहिल्यापासून त्यांना समाजकारणाची आवड असल्यामुळे त्यांना वकिली व्यवसायात रस वाटत नव्हता. व समाजकारण करत त्यांनी 1940 साली राजकारणात प्रवेश केला. सातारा जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी ते पाटण तालुक्यातून उमेदवार म्हणून उभे राहिले. व तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डात असलेली कुपरशाही मोडीत काढून ते सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले. व सलग बारा वर्षे लोकनेते बाळासाहेब देसाई सातारा लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. हेच लोकनेते साहेबांचे राजकीय यशस्वी पाऊल होते.

1947 साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 साली पाटण विधान सभा मतदार संघातून लोकनेते साहेब पहिले बिनविरोध आमदार म्हणून निवडून गेले. व महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एक अभ्यासू व्यक्ती म्हणून प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी वत्सलादेवी यांची मोलाची साथ होती. 1957 साली पुन्हा एकदा लोकनेते साहेब पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले व त्यांच्या कामाची पद्धत बघून त्यावेळच्या मंत्रिमंडळाने त्यांना बांधकाम मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी दिली. यावेळी त्यांनी कोयना धरण प्रकल्पाचा क्रांतिकारी निर्णय घेतला. व जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती केली. व पाटण तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी यांसारखे प्रश्न मार्गी लावले. तसेच त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम करत पाटण तालुक्यात कोयना नदीवर ३२ जलसिंचन प्रकल्प म्हणजेच लिफ्ट इरिगेशन सुरु केले.व पाटण तालुक्यातील नदीपात्राजवळील शेती हिरवीगार केली. १९६२ साली ते कृषिमंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम करीत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न मार्गी लावले. लोकनेते साहेब गृहमंत्री असताना अनेक तरुणांना पोलीस भरतीसाठी जाचक निकष बाजूला सारून अनेक युवकांना पोलीस पदी नेमणूक करण्यात अधिकाऱ्यांना भाग पाडले. कायदा हा सर्वसामान्यांसाठी आहे. असे सडेतोड बोलणारे लोकनेते साहेब होते. शिक्षण मंत्री असताना त्यांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले, प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करावी लागली. आपल्या वाट्याला शिक्षण घेत असताना कशा पद्धतीने तारेवरची कसरत करावी लागली. अशी वेळ कोणत्याही गरीब, हुशार मुलांवर येऊ नये म्हणून लोकनेते साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री असताना ज्या पालकांचे 1200 रुपये वार्षिक उत्पन्न आहे अशा मुलांना पहिली ते बारावीपर्यंत ईबीसी सवलत सुरू केली. त्यामुळे अनेक मुलांना शिक्षण घेता आले. पश्चिम महाराष्ट्र मध्ये एक सुंदर असे ज्ञानपीठ व्हावे म्हणून लोकनेते साहेबांनी कोल्हापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ स्थापन व्हावे यासाठी सिंहाचा वाटा उचलला. आज त्यांच्या नावाने अध्यापन शिवाजी विद्यापीठांमध्ये सुरू आहे. 

उषःकाल होता होता.. काळरात्र झाली... अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली... या भावगीताप्रमाणे 12 डिसेंबर 1967 सालची रात्र ही पाटण तालुक्याच्या दृष्टीने काळरात्र ठरली. पाटण तालुक्यातील कोयनानगर या ठिकाणी 5.6 रिस्टर स्केलचा भूकंप झाला. 167 जणांना आपले प्राण गमावले लागले. अनेक लोकांच्या घराच्या भिंती जमीन दोस्त झाल्या. अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले. त्यावेळी लोकनेते साहेब महसूल मंत्री होते. त्यांनी अवघ्या दोनच महिन्यात लोकांना तात्पुरत्या स्वरूपाची घरे उभी केली व त्या भूकंपग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध केल्या. 1978 -1979 मध्ये लोकनेते साहेबांनी विधानसभेचे अध्यक्ष स्थान ही भूषवले होते.

 माझा पाटण तालुका हा दुर्गम डोंगराळ व शिक्षणाने मागासलेला तालुका म्हणून ओळखला जात होता. हे ओळखून लोकनेते साहेबांनी 1967 साली कोयना शिक्षण संस्थेची स्थापना केली. पाटण तालुक्यातील लोकांना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी हा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपले मुंबई येथे अल्पावधीतच नावारूपाला आलेले सुपुत्र स्व. शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांना साखर कारखाना उभारणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना त्यांचे सुपुत्र शिवाजीराव देसाई यांनी अल्पावधीतच कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा केला.

 राजकारणातील हेवेदावे, धर्म पत्नीचे अकाली निधन, वाढते वय या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असताना लोकनेते साहेबांनी वाढता कलह लक्षात घेऊन राजकीय संन्यास घेतला. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात विविध मंत्रिपदे भूषवित असताना सर्वसामान्याना न्याय देण्याचे काम केले. वैयक्तिक तसेच सामाजिक कामे त्यांनी केली. म्हणून मराठी साहित्यिक प्र. के. अत्रे यांनी 'लोकनेते' ही पदवी बहाल केली. अशा या समाज सेवकाचा 24 एप्रिल 1983 साली त्यांनी जगाचा अखेर निरोप घेतला व अशा समाजप्रिय लोकनेत्याला पाटण तालुका मुकला.... 

आज आपल्या आजोबांचे व वडिलांचा वसा अखंडपणे सुरू ठेवण्याचे काम सध्याचे कॅबिनेट मंत्री मा. नामदार श्री शंभूराजे देसाई साहेब अविरतपणे करत आहेत. आज हयात असलेल्या जुन्या जाणत्या वयो-वृद्ध लोकांना लोकनेते साहेबांची आठवण नामदार शंभूराजे देसाई साहेबांमुळे आली. लोकनेते साहेबांनी केलेल्या कामामुळे आज त्यांची सातारा जिल्ह्यात नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ओळख होती. त्याचप्रमाणे त्याला साजेशे काम नामदार शंभूराज देसाई साहेब करत आहेत. 

आपल्या आजोबांचे तथा लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पाटण तालुक्यातील चिरंतर स्मारक व्हावे म्हणून मा. ना. शंभूराजे साहेबांनी शासन दरबारी पाठपुरावा करून कारखाना कार्यस्थळावर लोकनेते बाळासाहेब देसाई जन्मशताब्दी स्मारक भव्यदिव्य उभारले. त्यामध्ये लोकनेते साहेबांची ओळख आजच्या पिढीला व्हावी यासाठी फोटो संग्रह, स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका, संगणक, इंटरनेट सुविधा तसेच वस्तीगृह असे सुसज्ज इमारत आहे.

                         पाटण तालुका शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला तालुका... प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांचे अर्धवट शिक्षण होत होते हे ओळखून स्व. शिवाजीराव देसाई यांनी मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुलांना परगावी जावे लागत होते. पण आज या संस्थेची तीन माध्यमिक विद्यालय, एक इंग्रजी माध्यमाची शाळा ,एक ज्युनिअर कॉलेज व सीनिअर कॉलेज तसेच आय टी आय,तसेच गत वर्षी नव्याने सुरु झालेले कृषी महाविद्यालय असे शिक्षणाचे जाळे विणले असून त्यांची सर्वस्वी अध्यक्ष पदाची जबाबदारी मा. श्री रविराज देसाई दादा अविरतपणे सांभाळत आहेत. थोडक्यात स्व. लोकनेते साहेबांच्या स्वप्नातला पाटण तालुका,लोकनेते साहेबांचे खरे प्रतिबिंब आम्ही चालवू पुढे हा वारसा....या उक्तीप्रमाणे मा. नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या रूंपात आज तालुक्यांला नव्हे महाराष्ट्राच्या राजकारणात पहायाला मिळते,आजमितीला पाटण तालुक्यांचा विकासाचा रथ मा.श्री.नामदार शंभूराज देसाई साहेब मा. श्री रविराज देसाई दादा ही राम-लक्ष्मणाची जोडी विकासाचा महामेरू डाम डौलात उभारत आहेत. भविष्यात हीच खरी लोकनेत्यांना विकासाच्या बाबतीत खरी आदरांजली ठरेल. यात काही वावगे ठरणार नाही.

संकलन व शब्दांकन : 

संतोष बंडू कदम
मु.पो.येरफळे ता.पाटण जि.सातारा 
सहाय्यक शिक्षक- शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे