गुलाल उधळणीसह पालखी मिरवणुकीची भव्य शोभा.
मालदन|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पानवळवाडी मालदन तालुका पाटण येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने सकाळी हनुमान मंदिरात महिलांनी पाळणा म्हटला मंदिराच्या प्रवेशद्वारावर पाळणा बांधून त्यामध्ये हनुमानाची प्रतिमा ठेवून पाळणा गीत म्हणून झाल्यानंतर आरती संपन्न झाली व आरती झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली.. त्यानंतर भगवान हनुमानाला फुल अर्पण करण्यात आली या भक्तिमय वातावरणात ग्रामस्थ, महिला लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरतीनंतर गावातून पारंपरिक पद्धतीने भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी गुलालाची उधळण करत भक्तांनी उत्सवाचा आनंद घेतला.
या धार्मिक कार्यक्रमात पानवळवाडीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लहानथोर मंडळी पारंपरिक पोशाखात सजून, हनुमानाच्या पालखी सोहळ्यात श्रद्धेने नतमस्तक झाली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व पूजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बोत्रे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणुकीनंतर हनुमान मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
गावामधील युवा वर्गानेही या उत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत उत्सवाची शान वाढवली.
संपूर्ण गाव या दिवशी एकत्र येत हनुमान भक्तीत रममान दिसून आला. महिला, पुरुष, व लहानग्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे हनुमान जयंतीचा उत्सव अधिकच देखणा झाला.