पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: आज २१ व्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात स्वतःच्या कार्य-कर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अवकाशवीर कल्पना चावला, क्रिकेटपटू मिताली राज यांसारख्या महिलांकडून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपले जीवन आदर्शवत घडवले पाहिजे. यासाठी महिलांना समाजात सन्मानाने स्थान दिले पाहिजे आणि त्यांच्या बाबतीत समाजाचा दृष्टीकोन बदलायला हवा," असे मत बेलवडे खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संजय आटाळे यांनी व्यक्त केले.
ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुळेवाडी येथे आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये बोलत होते. या परिषदेत "निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कृती कार्यक्रम" याविषयी शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेच्या निमित्ताने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बेलवडे केंद्रातील सर्व महिला शिक्षकांचा गुलाबपुष्प आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच केक कापून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रप्रमुख श्री. संजय आटाळे व केंद्रातील सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी महिला शिक्षिका सौ. सुनीता पाटील यांनी "स्त्रीशक्ती – आजची सावित्री" ही कविता सादर केली.
या परिषदेदरम्यान निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय ऑनलाइन शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेवेळी मा. श्री. कृष्णा फडतरे (अधिव्याख्याता, डायट फलटण) यांनी या उपक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भात ऑनलाइन मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात तालुकास्तरीय स्वच्छ, सुंदर आणि उपक्रमशील शाळा स्पर्धेत त्रिपुडी शाळेला तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल शाळेचे अभिनंदन करण्यात आले. तसेच बेलवडे शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. सुरेश जाधव आणि हुंबरवाडी शाळेतील श्री. रामचंद्र सरक यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पळसे यांनी केले. प्रास्ताविक श्री. शरद मांढरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. दौलत कदम यांनी मानले.
यावेळी बेलवडे खुर्द केंद्रातील जेष्ठ शिक्षक श्री. संजय देसाई, श्री. सुनील पानस्कर, श्री. बाळकृष्ण गायकवाड, श्री. विलास कुंभार तसेच केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.