सत्यवान मंडलिक यांना ॲग्रोन्यूजचा 'उत्कृष्ट साहित्य सेवा पुरस्कार'







फलटण |कृष्णाकाठ वृत्तसेवा: फलटण येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण आयोजित आठवे वर्षीय 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन' दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुंदर अशा नियोजनात पार पडले. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य माननीय श्री रवींद्र बेडकीहाळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. साहित्यिकांनी आज समाजात चाललेल्या अराजकतेवर, वाईट प्रवृत्तींवर वास्तव लेखनातून घाव घालण्याचे काम केले पाहिजे. साहित्याची निर्मिती केवळ पुरस्कारासाठी न करता वाचकांनी वाचनाचा आनंद घेण्यासाठी करावा असे मत व्यक्त केले. तसेच माननीय श्रीमंत सुभद्रा ताई निंबाळकर यांनी सर्वांचे स्वागत करून आपला स्वागत अध्यक्ष पदाचा सन्मान केला व पुढील वर्षी आपणास अधिक संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी आश्वासनही दिले.

     महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणाहून अनेक नामवंत साहित्यिकांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती. त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीस पुरस्कार देऊन संयोजकांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी साहित्य गौरव,साहित्य भूषण, समाजभूषण, कालिदास सन्मान असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेले लेखक-कवी सत्यवान मंडलिक यांना 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य सेवा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या 'स्वातंत्र्याची ७५ वर्षे' या वैचारिक ललित लेख मालिकेच्या साहित्यकृतीस हा बहुमान मिळाला आहे. त्यानंतर कवी संमेलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर इचलकरंजीचे न्यू अथर्व प्रकाशनचे प्रकाशक, कवी-लेखक एम एस जाधव उर्फ बाबा जाधव व वाईचे कवी अमोल मांढरे यांनी व त्यांच्या बरोबर अनेक कवींनी सहभाग घेतला होता.सर्व कवींचा गौरव चिन्ह व सन्मानपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला.

      या सोहळ्याचे अध्यक्ष पद जेष्ठ साहित्यिक माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांनी भूषविले तर संमेलनाच्या अध्यक्ष पदी माननीय सोनाली डमाळे होत्या. माननीय श्रीमंत सुभद्रताई निंबाळकर या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष तर साहित्यिक माननीय श्री सिताराम नरके, (मराठी साहित्य परिषद ) नातेपुतेचे अध्यक्ष धैर्यशील देशमुख, सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप सिंह यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सिताराम नरके यांनी काव्य स्पर्धेत परीक्षक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडली. ॲग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटणचे अध्यक्ष माननीय प्रकाश सस्ते व संचालक मंडळाने हा सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कथा कथनकार व जेष्ठ साहित्यिक माननीय विजय काकडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व शेवटी उपस्थितांचे आभार मानले.