श्री संतकृपा अभियांत्रिकीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
“आजच्या तरुणांनी जागतिक बाजारपेठेत सक्षमपणे उभे राहावे. अन्यायाच्या विरोधात निषेध नोंदवत जनजागृती करावी आणि अत्याचारांविरोधात लढा उभारावा. अशा जिगरबाज तरुणांच्या जोरावरच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदर्श नागरिक घडू शकतील,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व वक्ते इंद्रजित देशमुख यांनी केले.
विद्यार्थ्यांना प्रेरित करताना इंद्रजित देशमुख म्हणाले, "युवकांनी सकारात्मक आणि विधायक कृतीवर भर द्यावा. देशाला एकत्र जोडणारा, माणुसकीची प्रेरणा देणारा तरुण तयार होणे गरजेचे आहे. आज भारताला अशाच जबाबदार आणि कर्तव्यदक्ष तरुणांची आवश्यकता आहे."
संस्थेचे सचिव प्रसून जोहरी सर यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नेहमी अपडेट राहण्याचा सल्ला दिला. तसेच महाविद्यालयाने NAAC B+ मूल्यांकन प्राप्त केल्याबद्दल वर्षभर परिश्रम घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. यामध्ये वर्षभर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच NAAC B+ मानांकन प्राप्त करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच यासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या विद्यार्थी आणि मॅनेजमेंटचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी वर्षभर विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच संस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
स्नेहसंमेलनाचा मुख्य आकर्षण ठरला "स्पंदन 2K25" हा सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय संस्थेचे जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्राध्यापिका भाग्यश्री पाटील यांनी मानले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका पूनम यादव व त्यांच्या संपूर्ण टीमसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.