कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: यशोदा फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने कुंभारगाव केंद्रातील सर्व ११ शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम केंद्र शाळा कुंभारगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण करून झाली. यावेळी यशोदा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शोभा मोरे, त्यांचे पती व संस्थेचे विश्वस्त श्री. नरेंद्र मोरे, विश्वस्त श्री. परदेशी साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बामणवाडी या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता देसाई मॅडम यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला. त्यांनी प्रस्ताविकातून यशोदा फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्री. एकनाथ पाटील सरांनी आपल्या प्रभावी शैलीत केले. यशोदा फाउंडेशनचे विश्वस्त श्री. महेंद्र मोरे यांनी संस्थेची स्थापना, उद्दिष्टे व कार्यक्षेत्र याविषयी सखोल माहिती दिली.
शिक्षक मनोगतात जेष्ठ मार्गदर्शक श्री. सुरेश कारंडे सर, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री. अधिक देसाई सर, शिक्षक सोसायटीचे संचालक श्री. सुनील वायचळ सर यांनी मनोगत व्यक्त केले. पालक प्रतिनिधी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. गौरी कचरे आणि विद्यार्थी प्रतिनिधी कु. कीर्ती महिंदकर यांनी यशोदा फाउंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यशोदा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शोभा मोरे मॅडम यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना भविष्यातही शैक्षणिक मदत देण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती करून समाजाभिमुख आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला चव्हाण मॅडम यांनी यशोदा फाउंडेशन व उपस्थित सर्वांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.