मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यात नवनवीन उद्योगधंदे येण्याची तयारी असल्याने कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र ‘मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग’ सुरू करण्याची आवश्यकता आहे, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शविली आहे. विधानसभेत बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले की, राज्यात बेरोजगारीवर सतत चर्चा होते, पण जर आपण कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी वेगळा विभाग स्थापन केला तर तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या विभागात कामगार मंत्रालयाचे सचिव, कौशल्य विकास विभागाचे सचिव, लोकप्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असावा, अशी त्यांनी मागणी केली.
भोसले पुढे म्हणाले की, हणमंतराव गायकवाड यांनी बीव्हीजीसारखा मोठा उद्योग निर्माण करून हजारो लोकांना रोजगार दिला आहे. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी देशाबाहेर मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची मागणी असल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव लवकरात लवकर अमलात आणल्यास राज्यातील तरुणांना जागतिक स्तरावर संधी मिळेल. तसेच, ईव्ही वाहने (इलेक्ट्रिक व्हेइकल्स) निर्मितीसाठी जागेची गरज असल्याचे भोसले यांनी अधोरेखित केले. "ऑटोनेक्स्ट" कंपनीने यासंदर्भात जागेची विनंती केली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. "मोठ्या तालुक्यांमध्ये मिनी एमआयडीसी विकसित करता येईल का, यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे," असे भोसले यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अभियानांतर्गत आतापर्यंत १.३२ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य सरकारचा पुढील उद्देश १० लाख तरुणांना प्रशिक्षण देण्याचा आहे. यामुळे राज्यातल्या तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला. १२,५०० कोटींची गुंतवणूक, नागपूर-गोवा महामार्गामुळे प्रमुख ठिकाणे जोडणे, आणि औद्योगिक विस्ताराला वेग देण्यास या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. राज्यातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग’ लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी आमदार भोसले यांची मागणी विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.