श्री बाळसिद्ध विद्यालय ग्रामीण भागातील आदर्शवत शाळा : अशोक कोठावळे


घोगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे संचलित श्री. बाळसिद्ध विद्यालय, घोगाव येथे शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश शिंदे (सॉफ्टवेअर इंजिनिअर, श्री. कॉम्प्युटर सिस्टीम, कराड), अशोक कोठावळे (मुख्याध्यापक, श्री. ज्योतिर्लिंग विद्यालय, जिंती) आणि ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे माजी संचालक शंकर हरी पाटील (आबा) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक डॉ. हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. रमेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगाचा योग्य उपयोग करून यशस्वी जीवन जगण्याचा सल्ला दिला. तसेच, अशोक कोठावळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उदाहरणे देत त्यांचे मनोबल वाढवले. त्यांनी श्री. बाळसिद्ध विद्यालयाच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीचा गौरव करत, ही शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आदर्श शाळांपैकी एक असल्याचे सांगितले.

यानंतर शंकर पाटील (आबा) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, जि. प. प्राथमिक शाळा घोगावचे मुख्याध्यापक उदय भंडारे यांनी आई-वडिलांच्या ऋणात राहून त्यांची सेवा करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जयश्री पाटील मॅडम, तर आभार प्रदर्शन दिनकर आंबवडे सर यांनी केले.

कार्यक्रमाला शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. समारोपानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.