खुली व्यायामशाळा उभारुन जपल्या राष्ट्रीय कबड्डीपटूच्या स्मृती..मान्याचीवाडीचा उपक्रम
 तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
राष्ट्रीय स्तरावरील माजी कबड्डीपटू स्व.उत्तमराव माने यांच्या स्मृतीनिमित्त मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने खुली व्यायामशाळेचा शुभारंभ करुन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. गावाच्या जडणघडणीत त्यांची मार्गदर्शकाची भूमिका महत्वपूर्ण ठरल्याने मान्याचीवाडीचा डंका सातासमुद्रापार वाजत आहे. स्वातंत्र्य सैनिक जिजाबा माने यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी सरपंच रवींद्र माने, सदस्य दिलीपराव गुंजाळकर, मनिषा माने, लता आसळकर, निर्मला पाचुपते, सीमा माने, पोलीस पाटील विकास माने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब माने, विठ्ठल माने, सर्जेराव माने, अधिकराव माने, माजी सरपंच संगिता पाचुपते, जेष्ठ नागरिक आनंदराव माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

       पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी या आदर्श गावचे रहिवासी आणि राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडू स्व.उत्तमराव माने यांनी क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. ते स्वतः कबड्डीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यशस्वी झाले होते. त्यांच्या दोन कन्या उज्वला माने आणि प्रज्ञा माने यांना खेळाचे धडे दिले. त्यांनाही वेटलिफ्टींग आणि बास्केटबॉल या खेळात महाराष्ट्र शासनाने छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी क्रिडा क्षेत्राबरोबरच राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही योगदान दिले होते. सातारा येथील क्रांतीस्मृती महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले. तर सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ विभागाचे सभापती म्हणून काम पाहिले होते. त्याचबरोबर देशात अव्वल ठरलेल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली.

    त्यांच्या या कार्याचा आदर्श घेऊन ग्रामस्थांनी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त गावकऱ्यांसाठी खुली व्यायामशाळा उभारत त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील कामगिरीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला. गावातील सर्वात ज्येष्ठ नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिक जिजाबा माने यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी मनोगते व्यक्त केली. 

__________________________________

स्व.उत्तमराव माने यांनी गावाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या स्मृती जपण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी खुली व्यायामशाळा उभारली आहे. या माध्यमातून गावकऱ्यांचे आरोग्य निरोगी राहीलच मात्र गावातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे यासाठीही आमचा प्रयत्न राहील. 

रवींद्र माने, सरपंच मान्याचीवाडी

__________________________________