श्री क्षेत्र वाल्मिकी यात्रा उद्यापासून सुरू



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात, ढेबेवाडीपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर, घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र वाल्मिकी हे निसर्गरम्य आणि अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. याच ठिकाणापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे भव्य यात्रा आयोजित करण्यात आली असून, ती सोमवार, २४ फेब्रुवारी (विजया एकादशी) पासून सुरू होणार आहे आणि २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री) पर्यंत चालणार आहे. या तीन दिवसांच्या यात्रेच्या आयोजनासाठी श्री क्षेत्र वाल्मिकी देवस्थान ट्रस्ट, पाणेरी ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. यात्रेच्या काळात दूरदूरवरून भाविक पायी दिंड्या घेऊन पठाराकडे येत असतात.

यात्रे दरम्यान राम-नाम जप, कीर्तन, भजन, भारुड यांसारखे धार्मिक कार्यक्रम दिवस-रात्र आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी, २६ फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून, त्यादिवशी पालखी मिरवणूक, आरती, दहीकाला, दहीहंडी यांसारखे विशेष कार्यक्रम होणार आहेत. यात्रेला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी एस.टी. महामंडळाकडून पाटण, कराड, सांगली, कोल्हापूर या ठिकाणांहून जादा बससेवेची मागणी करण्यात आली आहे. तसेच वाहन पार्किंग, पाण्याचा पुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य सुविधा यांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.



यात्रेच्या सुरक्षिततेसाठी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे API डॉ. प्रवीण दाईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाणेरी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. शिवाजी पवार यांनी सांगितले की, यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित यंत्रणा सज्ज आहेत. भाविक-भक्तांना एक सकारात्मक आणि भक्तिमय अनुभव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत.