घोगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा : श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील आणि श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी "छत्रपती शिवाजी महाराज की जय", "जय भवानी, जय शिवाजी" अशा घोषणांनी महाविद्यालयाचा परिसर दणाणून टाकला. ढोल-ताशांच्या निनादात आणि पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी भव्य मिरवणूक काढली. संपूर्ण महाविद्यालय शिवमय झाले होते.
कार्यक्रमात प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्य स्थापनेची महान गाथा आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांनी प्रेरणा घेत शिस्त, धैर्य आणि नेतृत्वगुण आत्मसात करावेत, असे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली. त्यांच्या भाषणांमध्ये शिवरायांचे विचार, पराक्रम आणि लोककल्याणकारी धोरणे यांचा उल्लेख करत, आजच्या पिढीला त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. अरुणा परीट यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण महाविद्यालय शिवमय वातावरणाने भारावून गेले होते.शिवजयंती उत्सवाने सर्वांना एकतेचा आणि संस्कृतीचा संदेश दिला.