ढेबेवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने दाखवलेल्या उत्कृष्ट तपास कौशल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, सातारा येथे API डॉ. प्रवीण दाईगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांत ढेबेवाडी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांवर वेगवान आणि अचूक तपास करून अनेक गुन्ह्यांची उकल केली. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे, अजामिन पात्र वॉरंटची बजावणी, तसेच मुद्देमाल नीर्गती यासारख्या महत्त्वाच्या बाबतीत पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. सीसीटीव्ही फुटेज, बातमीदारांची मदत आणि अत्याधुनिक तपास पद्धतींचा वापर करून आरोपींना पकडण्यात आले.
API डॉ. प्रवीण दाईगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात उपनिरीक्षक इंद्रजीत चव्हाण, हवालदार नवनाथ कुंभार, प्रशांत चव्हाण, कॉन्स्टेबल प्रशांत माने, सौरभ कांबळे, उज्वल कदम, माणिक पाटील, अशोक निकम यांनी कठोर परिश्रम घेत गुन्हेगारांना न्यायालयात उभे केले. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल संपूर्ण पथकाला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सन्मानाने ढेबेवाडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षमतेची आणि जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या कटिबद्धतेची पुन्हा एकदा पावती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.