सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरटे जेरबंद; ढेबेवाडी पोलिसांची कारवाई



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
चोरी करून फरार होण्याचा चोरट्यांचा डाव ढेबेवाडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून उधळून लावला. गूढे, ता. पाटण येथील गणेश नगर येथे बंद असलेल्या शिवप्रसाद सेंट्रिंग मटेरियल सप्लायर आणि भाड्याने साहित्य देण्याच्या शेडमधून दोन चोरट्यांनी २२ जानेवारीच्या रात्री साहित्य लंपास केले होते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या तपासातून चोरीचा छडा लावत दोन्ही आरोपींना जेरबंद केले.

चोरीप्रकरणी अशोक शेषराव झारगड (रा. शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी, कराड; मूळगाव हिवरशिंगा, ता. शिरूर, जि. बीड) आणि अनिल किसन धोत्रे (रा. सुर्यवंशी मुळा, कराड) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून कटर मशीन, ७५ शिकंजे, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (क्र. एम. एच. ५० ई ३७७९) असा ₹५६,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी ढेबेवाडी पोलिसांनी परिसरातील विविध मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. पोलिस स्टेशनचे सपोनि डॉ. प्रवीण दाईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, हवालदार प्रशांत चव्हाण, नवनाथ कुंभार, प्रशांत माने, संजय थोरात आणि सहील जाधव यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

पोलिसांच्या तडाखेबंद तपासामुळे या चोरट्यांचा गुन्हेगारी प्रवास अर्ध्यावरच संपला. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास ढेबेवाडी पोलिस करत आहेत.