पक्ष संघटन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्षपदी संजय देसाई यांची निवड करण्यात आली आहे. कुंभारगाव ता. पाटण येथील जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती असलेल्या देसाई यांना पक्षाने ही जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यालयात खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी फलटणचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे संचालक व फलटणचे नूतन तालुकाध्यक्ष शिवरुपराजे खर्डेकर, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, राजेंद्र लवंगारे, प्रतिभा शिंदे, सीमा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यातून राजकीय प्रवास
संजय देसाई यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपले
आजोबा कै. शंकरराव आकोबा देसाई यांच्या विचारांनी प्रेरित होत सामाजिक कार्यास सुरुवात केली. १९९९ मध्ये कुंभारगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांची निवड झाली. त्याच वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाच्या कार्यात सक्रीय राहिले.
त्यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा परिषदेच्या शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीचे सभापती, वाई विधानसभा निरीक्षक, नवभारत को-ऑप क्रेडिट सोसायटी तळमावलेचे संस्थापक अध्यक्ष आदी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तसेच, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले यांच्या विकास समिती सदस्यपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.
महत्त्वाची जबाबदारी
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संजय देसाई यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा पक्षश्रेष्ठींचा विश्वास आहे.