तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे हे गेली 10 वर्षापासून आपला वाढदिवस विधायक उपक्रमांनी संस्मरणीय करत आहेत. यंदा महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात 1 ते 15 जानेवारी दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम सुरु केला आहे. त्याअंतर्गत दि.1 ते दि.15 जानेवारी 2025 हा वाचन पंधरवडा म्हणून राबवला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून डाॅ.संदीप डाकवे हे 9 जानेवारी, 2025 पासून पुस्तक भेट अभियान सुरु करत आहेत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त भेटवस्तू, केक, बुके या ऐवजी पुस्तके देण्याचे आवाहन डाॅ.डाकवे यांनी केले आहे.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय आणि डाकवे परिवार यांच्या वतीने पुस्तकांचं झाड, मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, स्पंदन उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार‘ असे वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
वाढदिवसानिमित्त शेकडो फ्लेक्स लावायचे, शक्तिप्रदर्शन करायचे असा फंडा अनेकजण राबवताना दिसतात. मात्र खऱ्या अर्थाने जनतेशी बांधिलकी असलेला व्यक्ती हा सगळा तामझाम करण्यापेक्षा लोकहित डोळ्यासमोर ठेऊन उपक्रम राबवतो. डाॅ.संदीप डाकवे हे अशा सामाजिक बांधिलकीच्या विचाराने प्रेरित होवून उपक्रम करत तडीस नेतात.
यापूर्वी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप, शालेय तक्त्यांचे वितरण, स्वलिखित ‘मनातलं’ या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन, अनाथाश्रमात धान्याचे वाटप, ऊसतोड मजूरांना शाल वाटप, रक्तदान, ग्रंथालयाला 75 पुस्तके वाटप, स्नेहबंध पुस्तक अनावरण असे नावीण्यपूर्ण आणि हटके उपक्रम राबवले आहेत.
वडील स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांचेकडून समाजासाठी काहीतरी करावे हे बाळकडू डाॅ.संदीप डाकवे यांना मिळाले. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून गरजूंसाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली.
या ट्रस्टच्या माध्यमातून शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून समाजमनावर आपली कर्तृत्वमुद्रा उमटवली आहे. 32 पेेक्षा जास्त कलात्मक मोठ्या कौशल्यपूर्वक जपले आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थामधून कलाप्रदर्शने राबवले आहेत. डाॅ.संदीप डाकवे यांच्या कर्तृत्वाची दखल प्रिंट मिडीयासह दूरदर्शन, टीव्ही 9 मराठी, न्यू 18 लोकमत, झी 24 तास, जय महाराष्ट्र, ए एम न्यूज या इलेक्ट्राॅनिक मिडीयासह स्थानिक चॅनेलनेही घेतली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाने सहावेळा तर विविध सामाजिक संस्थांनी त्यांना आतापर्यंत सुमारे 75 पुरस्कार देवून यथोचित गौरव केला आहे. याशिवाय डाॅ.डाकवे यांची 11 पुस्तके प्रकाशित झाली असून अजून 3 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
कलासंपन्न, सामाजिक जाणिवेचे भान असलेल्या संदीप डाकवे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकडून भावी आयुष्यातही अशीच भरीव कामगिरी होत राहील यात शंकाच नाही.
पुस्तक भेट अभियानाच्या माध्यमातून वाचन चळवळीमध्ये योगदान देण्याचा प्रयत्न आहे. वाढदिवस, विविध कार्यक्रम यामध्ये सत्कारासाठी बुके किंवा अन्य भेटवस्तू ऐवजी पुस्तक भेट देण्याचा संकल्प केला असून हे पुस्तक भेट अभियान भविष्यात त यशस्वी ठरेल असे मत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे.