जनसहकार पतसंस्था ‘बँको ब्ल्यू रिबन २०२४’ पुरस्काराने सन्मानीत


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  
सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी जनसहकार पतसंस्थेस प्रतिष्ठित ‘बँको ब्ल्यू रिबन २०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा मानाचा पुरस्कार माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

हा विशेष सोहळा लोणावळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा गौरव म्हणून दिला जाणारा हा पुरस्कार पतसंस्थेच्या सर्व संचालक, सभासद व कर्मचाऱ्यांच्या कष्टाची पावती आहे.

या सोहळ्यास बँको चे अविनाश शिंत्रे, गॅलॅक्सी इन्मा चे अशोक नाईक, तसेच संस्थेचे संस्थापक व चेअरमन मारुती मोळावडे, व्हा. चेअरमन अमोल मोरे (सरकार), संचालक प्रशांत पोतदार शेठ, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मोळावडे, व्यवस्थापक प्रदीप मोळावडे, शाखाव्यवस्थापक महेश घागरे, तसेच सुहास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन मारुती मोळावडे यांनी संस्थेच्या यशामागील सर्व सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाच्या मेहनतीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका आहे. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून अधिक दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या सन्मानामुळे संस्थेच्या सभासद, संचालक, सल्लागार आणि संपूर्ण सेवकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून, हा पुरस्कार संस्था आणि तिच्या हितचिंतकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. संस्थेच्या या उज्ज्वल यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.