तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: पाटण तहसील कार्यालय आणि तळमावले मंडल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त महसुली भेट अन् वारस नोंद थेट या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या सुशासन - शासन आपल्या दारी या अभियानाचा प्रभावी अंमल करण्यात आला.
तळमावले मंडल स्तरावर चिखलेवाडी, मालदन, शेंडेवाडी, खळे, कुंभारगाव, साईकडे या गावांमध्ये प्रलंबित वारस नोंदींचे काम पूर्ण करण्यात आले. यावेळी मयत खातेदारांच्या वारसांना वारस नोंदी, सातबारा, खाते उतारे असे एकूण ४८२ दाखले वितरित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ देण्यात आला.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडल अधिकारी श्रीनिवास देशमुख, तळमावले ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब गायकवाड, कुंभारगाव ग्राम महसूल अधिकारी आकाश गुरव, खळे ग्राम महसूल अधिकारी राजश्री पवार, मालदन ग्राम महसूल अधिकारी जयवंतराव पवार, चिखलेवाडी ग्राम महसूल अधिकारी व मंडलातील महसूल सेवक साधना जाधव, दिपक इंगवले, विजयकुमार महापुरे, हणमंत कारंडे, अभिषेक मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा उपक्रम ग्रामीण भागातील जनतेला महसुली सेवा घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.