महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र सध्या मोठ्या आव्हानांना सामोरे जात आहे. या क्षेत्राची अधोगती थांबवण्यासाठी आणि सहकाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मळाई ग्रुप मलकापूर, कराड येथील सहकारी संस्था आणि कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने “राज्यस्तरीय तिसरी सहकार परिषद २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत कराड अर्बन को-ऑप. बँकेच्या मुख्य कार्यालयातील ‘शताब्दी सभागृह’, शनिवार पेठ, कराड येथे होणार आहे. अर्बन ग्रुप आणि कराड अर्बन को-ऑप. बँक या परिषदेला प्रायोजक आहेत.
परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी कराड अर्बन बँकेचे सुभाषराव जोशी अध्यक्षस्थानी राहणार असून मळाई ग्रुपचे प्रमुख अशोकराव थोरात, कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शेटे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक आणि सहायक उपनिबंधक अपर्णा यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सहकार क्षेत्राची अधोगती रोखण्यासाठी या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पहिल्या सत्रात प्रा. डॉ. एस. एम. भोसले, प्राचार्य, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामीण विकास या विषयावर आपले विचार मांडतील. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. संतोष यादव, देवचंद कॉलेज अर्जुननगर, महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची सद्यस्थिती या विषयावर चर्चा करतील. तिसऱ्या सत्रात प्रा. डॉ. विजय पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य, बापूजी साळुंखे कॉलेज, केंद्रातील नवीन सहकार कायदा व धोरण यशापयश यावर आपले विचार व्यक्त करतील. समारोप सत्रात मळाई ग्रुपचे अशोकराव थोरात सहकार क्षेत्राच्या भवितव्यावर मार्गदर्शन करतील.
ब्रिटीश काळात सुरू झालेली सहकार चळवळ महाराष्ट्रात १९६० च्या सहकार कायद्यामुळे शेती, उद्योग आणि रोजगाराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरली होती. परंतु, १९९१ च्या नवीन आर्थिक धोरणानंतरच्या खाजगीकरणामुळे सहकार चळवळीवर विपरीत परिणाम झाला आहे. राजकारण, घराणेशाही आणि भ्रष्टाचारामुळे सहकारातील स्वच्छता आणि लोकशाही तत्त्वांना तडा गेला आहे. या परिषदेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीवर विचारमंथन होणार आहे.
परिषदेचा उद्देश सहकार क्षेत्रासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ निर्माण करणे, तरुण पिढीला सहकाराची महत्त्व पटवून देणे आणि सहकार क्षेत्रातील आव्हानांवर उपाय शोधणे हा आहे. या परिषदेत प्रवेश विनामूल्य असून सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी, पदाधिकारी, अभ्यासक आणि सहकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक-विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मळाई ग्रुपचे अशोकराव थोरात यांनी केले आहे.