स्पंदन ट्रस्टचे विधायक कार्य समाजाला पुढे घेऊन जाणारे : प.पू.धारेश्वर महाराज


प.पू.धारेश्वर महाराज यांना स्पंदन जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना मंगेश चिवटे, विठठल डाकवे, संगिता साळुंखे, कविता राम, ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे व डाकेवाडी ग्रामस्थ.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
स्पंदन ट्रस्टचे विधायक कार्य समाजाला पुढे घेऊन जाणारे आहे. या ट्रस्टने विविध क्षेत्रात काम करत वाचन चळवळ वाढवली आहे. ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन केले आहे, असे मत तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थानाचे मठाधिपती डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांनी व्यक्त केले. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड वितरण सोहळयात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, पार्श्वगायिका कविता राम, मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काॅंग्रसे शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ.संगिता साळुंखे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री अंजली आकळे, शिवम असोसिटसचे गुलाब जाधव, पत्रकार अविनाश काशीद, ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार सोहळयाचे हे सहावे वर्ष आहे.

प.पू.धारेश्वर महाराज पुढे बोलताना म्हणाले की, ‘‘सुदृढ समाजासाठी संस्कार हे अत्यावश्यक असतात. सध्याच्या काळात अशाच संस्काराची गरज निर्माण झाली आहे, समाजामधील चांगली माणसे जपली पाहिजेत. त्यांना पाठबळ दिले पाहिजे’’

यावेळी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने धारेश्वर महाराजांना स्पंदन जीवन गौरव पुरस्कार मान्यवर आणि डाकेवाडी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रदान केला. रोख रक्कम रु. 5,000/- , मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक असे स्वरुप होते. या पुरस्काराचा महाराजांनी स्वीकार केला. मात्र पुरस्काराची रक्कम स्पंदन ट्रस्टच्या सामाजिक कार्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडे सुपूर्द केली. महाराजांच्या या दातृत्वाचे उपस्थितांनी टाळयांच्या गजरात अभिनंदन केले.

मंगेश चिवटे यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी स्पंदनच्या कार्याचे कौतुक करत स्पंदन परिवाराने आमच्याही सोबत काम करावे असे सांगत ट्रस्टला मदत जाहीर केली आहे. 

संगीता साळुंखे यांनी सत्कारामुळे प्रेरणा मिळते व जबाबदारीही वाढत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी कुटुंबाचे महत्व विषद करत कार्यक्रमात रंगत भरली. तसेच ट्रस्टच्या कार्याने प्रभावित होत कार्यक्रम संपण्यापूर्वी ट्रस्टला भरघोस देणगी दिली.

पार्श्व गायिका कविता राम यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर ‘‘दिगंबरा दिगंबरा, श्री स्वामी समर्थ जय’’ इत्यादि भजनाने सभागृहातील प्रत्येकाला त्या भजनात सामावून घेत आपल्या आवाजाची जादू दाखवली. त्यांच्या या गीतांच्या झलकेमुळे कार्यक्रमाला चार चाँद लागले. जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेल्या कु.अन्वी अनिता चेतन घाटगे हिला प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी तिने शिवरायांची गारद म्हटली. या शिवरायांच्या गारदेमुळे सभागृहात चैतन्य निर्माण झाले.

दरम्यान, प.पू. धारेश्वर महाराजांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी त्यांचे शिष्य रोहित जंगम यांनी मंत्रोच्चारात त्यांचे स्वागत केले. यामुळे वातावरण भक्तीमय झाले. व्याख्याते किरण कोरे यांचे सुरुवातीचे भाषण प्रेरणादायी ठरले. त्यामुळे लोकांच्यात ऊर्जा निर्माण झाली. त्यांचे शब्दोच्चार लोकांना खिळवून ठेवत होते. पत्रकार, कविवर्य गजानन तुपे यांनी स्पंदन ट्रस्ट आणि डॉ.संदीप डाकवे यांच्यावर सादर केलेल्या कविता, शेरोशायरी यामुळे कार्यक्रमांचा माहोल बदलून गेला.

‘‘रोल, कॅमेरा, ॲक्शन’’ हे तीन शब्द नेहमी बोलणाऱ्या दिग्दर्शक विठ्ठल डाकवे यांच्या अफलातून भाषणाने उपस्थितांसह डाकेवाडीकरांची मने जिंकली. विशेष म्हणजे ते पत्नी आणि मुलासह कार्यक्रमात सहभागी होते.

याशिवाय याच कार्यक्रमात राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार विजेते साहित्यिक, स्पंदन दिवाळी अंक स्पर्धेतील विजेते, सेल्फी विथ गुढी स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान केला गेला. या कार्यासाठी सोलर पॉवर व्हिजन कराड यांनी मोलाचे सहकार्य केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदीप डाकवे, सुत्रसंचालन शीतल दवणे आणि आभार प्रदर्शन भीमराव धुळप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल डाकवे, सुरेश मस्कर, विकास डाकवे, सौ. रेश्मा डाकवे, सौ. वनिता डाकवे, सौ.सुमन डाकवे, प्रथमेश डाकवे, पौर्णिमा डाकवे, अक्षता डाकवे, सत्यवान मंडलिक, विकास साळुंखे, संतोष करपे, अनिल देसाई, सीमा देसाई, समाधान पाटील, विठ्ठल डाकवे, भरत डाकवे, रोहित जंगम यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले. 

______________________________

सभागृहाबाहेर ट्रस्टची नाव आणि उपक्रमाची कमान, नाव नोंदणी ठिकाणी ट्रस्ट आणि विविध स्पर्धांच्या लोगोंचा बॅनर, पुरस्कारार्थीना फेटा, आयडेंटी, गळ्यात गमजा, आकर्षक सन्मानचिन्ह यामुळे कार्यक्रम आखीव व रेखीव झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मित्र परिवार, नातेवाईक, कुटुंबीय इ.सोबत वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाची उंची आणि दर्जा वाढवला.

______________________________