प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन यांना काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचार सुरु होते. झाकीर हुसैन यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे चाहते आणि संगीत जगतात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली  वाहिली जात आहे. या कधीही भरून न येणाऱ्या नुकसानाबद्दल जगभरातील संगीतप्रेमी आणि कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादनाच्या जगात त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी ओळखले जात होते. 1951 मध्ये तबला वादक उस्ताद अल्ला रखा यांच्या पोटी जन्मलेल्या झाकीर हुसैन यांनी लहानपणापासूनच आपले संगीत कौशल्य दाखवायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी त्यांनी रंगमंचावर सादरीकरण करून तबल्याला नवी ओळख दिली.

संगीत क्षेत्रात अविस्मरणीय योगदान

झाकीर हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. 1970 मध्ये, त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन सोबत, "शक्ती" नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली.