परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते त्यातून माणूस घडत असतो समाजातील विविध प्रकारच्या लोकांकडून त्यांना खूप काही शिकता येतं, परिस्थिती संकटावर मात करण्याचे बळ देते आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद देते जीवन जगत असताना सुख दुःखाचा खेळ सुरू असतो. अशा विविध प्रसंगातून अनुभव घेऊन संकट आली म्हणून निराश न होता न रडता धैर्याने व हिमतीने संकटावर मात करण्याची जिद्द त्याच्याकडे असते तो जीवनात यशस्वी मार्गक्रमण करतो.
जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती , सातत्य व परिश्रम या सूत्रांचा जीवनात अंगीकार करणारे लहानपणापासून अहोरात्र कष्ट करून अनेक संकटांना धैर्याने परतवणारे व त्यातून फिनिक्स पक्षाप्रमाणे अवकाशात गरुड भरारी घेणारे जीवनात संघर्ष काय असतो याचा आदर्श इतर नवोदित युवकांना घालून देणारे शांत संयमी असे संघर्ष योद्धा म्हणजे शुन्यातून विश्व निर्माण करणारे यशस्वी उद्योजक व एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे अशोक मासाळे . आज त्यांचा जन्मदिन या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात आढावा...
हलाखीची गरिबी, आई-वडील मजूर, कुणाचा आधार नाही, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अशोक चंद्राप्पा मासाळे हे एक यशस्वी व्यावसायिक म्हणून आज वाटचाल करीत आहेत. माणसाकडे मनापासून जिद्द असली की माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करुन यशस्वी होतो. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अशोक मासाळे हे होय! श्री डेव्हलपर्स अॅण्ड कन्स्टल्टंट या कंपनीच्या माध्यमातून आज ते आपला व्यवसाय सांभाळत आहेत....
मुळचे कर्नाटकातील महालिंगपुरचे असणारे पण रोजगाराच्या शोधात चंद्राप्पा मासाळे यांनी सांगली गाठली. सुदैवाने त्यांच्या पत्नी राधाबाई या सांगलीच्याच. या दाम्पत्याने मिळेल ते काम करुन पोट भरण्याचा प्रयत्न चालविला आणि त्याचवेळी त्यांच्या संसारवेलीवर अशोक यांचा जन्म झाला. लहानपणापासून चटके खात मोठे होत असलेल्या अशोक यांना परिस्थितीने खूप शिकविले. शिक्षणाचा श्रीगणेशा त्यांनी सांगली महापालिकेच्या शाळा क्रमांक ३८ मधून केला. पहिलीपर्यंतचे शिक्षण या शाळेत झाले. मात्र रोजगाराच्या निमित्ताने त्यांच्या आई-वडीलांना सांगली सोडून जतला जावे लागले. मग अशोक यांचे दुसरी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण जतला झाले. पुन्हा आई-वडील सांगलीला आले. दरम्यानच्या काळात आई-वडीलांची ही ओढाताण पाहून आपणही त्यांना थोडाफार मदतीचा हातभार लावावा या हेतूने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षापासून अशोक यांनीही कामाला सुरुवात केली. सुरुवातीस टिंबर एरियातील भालेकर वखारीत दिवसाला पाच रुपये मजुरीवर काम सुरु केले. यावेळी त्यांचे मामा बबन रणधीर यांची त्यांना मदत झाली. त्यानंतर त्यांनी १९९० ते २००० अशी दहा वर्षे सुतार काम केले. कामाला वाहून घेतल्याने शाळा सुटली. मामा बबन रणधीर यांच्याबरोबर वावरताना त्यांनी अनेक बारकावे समजून घेतले. काळ पुढे सरकत होता. परंतु अद्याप जीवनाची दिशा सापडत नव्हती. शिक्षण अर्धवट राहिले याचे शल्य होतेच मग त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेण्याचा मार्ग निवडला. शिक्षण आणि काम हे दोन्ही चालू ठेवले. दरम्यानच्या काळात मामा प्लॉट विक्री व्यवसाय करु लागला. मामांबरोबर फिरताना या व्यवसायाची माहिती अशोक यांनी आत्मसात केली. जमलेल्या तुटपुंजीतून कुपवाड येथे स्वतः तीन गुंठ्यांचा प्लॉट खरेदी केला. अवघ्या एका वर्षात हा प्लॉट घेतलेल्या किमतीच्या दुप्पट किमतीने विकला. आणि मग ते याच व्यवसायात स्थिरावले आणि खऱ्या अथनि त्यांच्या यशस्वी जीवनाची सुरुवात येथूनच झाली. प्लॉट खरेदी-विक्री व्यवसायाबरोबरच त्यांनी 'अशोक फर्निचर अॅण्ड डेकोरेटर' ही फर्म सुरु केली. सुतार कामाचा अनुभव असल्याने थोड्याच दिवसात प्लॉट विक्री आणि फर्निचर व्यवसायातून आर्थिक अडचणींवर मात करुन जीवनात स्थिरता निर्माण केली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. यशाचे एक एक पाऊल टाकत आज यशस्वी डेव्हलपर्स म्हणून सांगली परिसरात त्यांनी नावलौकिक निर्माण केला आहे. अर्थात त्याचे सारे श्रेय ते आपले मामा बबन रणधीर, टिंबर एरियातील व्यापारी व मित्र परिवाराला देतात. पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि विविध महाविद्यालयात कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी अनेक कामे केली आहेत. 'श्री' डेव्हलपर्स' च्या माध्यमातून या व्यवसायाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. परिस्थितीवर मात करुन यशस्वी होता येते. याचा आदर्श अशोक मासाळे यांनी समाजासमोर ठेवला आहे. परिस्थितीचे भांडवल करून रडगाणं गाणारे कधीच यशस्वी होत नाहीत हेच यावरुन सिध्द होते. परिस्थितीशी झगडत असतानाच सामाजिक बांधिलकीची वीण त्यांनी कधी तुटू दिली नाही. कायम आपल्या परीने समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करत राहिले. आज यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांनी नाव कमविले असले तरी सामाजिक बांधिलकीची भावना कायम जपत आजही अनेकांना ते मदतीचा हात देत आहेत. मुलामुलींना शैक्षणीक साहित्याचे वाटप ते दरवर्षी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे जयंती समारंभात ते कायम अग्रभागी असतात. समाजातील गोरगरीब बेघरांसाठी मोठी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा मानस आहे.
सामाजिक कामांबरोबरच ते राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असणारे अशोक मासाळे यांनी मुन्ना कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली. दिवंगत मंत्री मदन पाटील, माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. आज युवा नेते विशाल पाटील अणि जयश्री पाटील यांचे नेतृत्व मानून ते आपली राजकीय वाटचाल करत आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली पण त्यात यश आले नाही. काम करत राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे भविष्यात नेते मंडळी योग्य ती संधी देतील अशी खात्री त्यांना आहे. छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू- आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णा भाऊ साठे या प्रभूतींच्या विचाराने समाजाने वाटचाल करावी, अशी त्यांची भावना आहे. सांगली शहरात अण्णा भाऊ साठेंचे स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे सुसज्ज ग्रंथालय व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
शून्यातून विश्व निर्माण करून समाजापुढे आदर्श निर्माण करताना त्यांच्या या प्रयत्नांना त्यांची पत्नी सौ. रेखा, त्यांचा मुलगा श्री.अक्षय व सुन सौ. प्रिया या कायम मोलाची साथ देत आहेत. आकांक्षा व गंगा या दोन कन्या आहेत. श्री.अक्षय मासाळे हे श्री डेव्हलपर्स आणि कन्सल्टंट या संस्थेचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. विशिष्ट ध्येय ठेवून वाटचाल केली तर यश हमखास मिळतं त्यासाठी कष्टाची तयारी हवी. आज मी माझ्या जीवनाकडे पाहतो तेव्हा त्याचा प्रत्यय येतो. मला मिळालेल्या मानवी जीवनाचे खऱ्या अर्थानं सार्थक झाले आहे, अशी प्रांजळ भावना ते व्यक्त करतात. आज मी समाधानी आहे. समाजातील प्रत्येक तरुणाने समाधानी असावं यासाठी प्रयत्न करावा असा संदेशही त्यांनी तरुणांना दिला आहे. श्री डेव्हलपर्स अॅण्ड कन्सल्टंट या फर्मच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात आज व्यापक प्रमाणात काम केले जात असले तरी संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र व्हावं असा त्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरु केली आहे. आणि लवकरच त्यात यशस्वी होतील. या दृष्टीनं त्यांनी नेटकं नियोजनही केलं आहे.
संस्थापक, अध्यक्ष आण्णा लोकसेवा फाऊंडेशन, सांगली, सरचिटणीस :सांगली शहर जिल्हा काँग्रेस (आय),माजी उपाध्यक्ष: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा जयंती महोत्सव समिती अशा सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील विविध पदावर अशोक मासाळे आज कार्यरत आहेत. यातून ते आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
प्रतिकूल परिस्थितीतून जन्माला येऊन अहोरात्र कष्ट करत शून्यातून विश्व निर्मितीकडे झेपावणारे, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जन्म घेऊन अवकाशात गरुड भरारी घेणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे श्री डेव्हलपर्स अॅण्ड कन्सल्टंट चे सर्वेसर्वा अशोक मासाळे यांना त्यांच्या भविष्यातील स्वप्न व संकल्पना पूर्ण करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या पंखात हत्तीचे बळ देवो त्यांचे आरोग्य सदैव निरोगी राहो, त्यांच्या भविष्यातील स्वप्न व संकल्पना पूर्णत्वास जावो हीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना व त्यांना पुढील भावी वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.
- शब्दांकन : सुशांत मलगोंडा पाटील