कुंभारगांव येथील श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा १५ व १६ नोव्हेंबरला.१६ नोव्हेंबरला पालखी सोहळा.

इतिहासात प्रथमच यात्रा होणार तमाशा आणि मातीतील कुस्तीशिवाय.




कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगांव (ता. पाटण) येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवीचा वार्षिक यात्रोत्सव शुक्रवार, १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या यात्रेत १६ नोव्हेंबर रोजी पालखी सोहळा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने, यंदा यात्रेत तमाशा आणि मातीतील कुस्तीचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे.

यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत यात्रा कमिटी, ग्रामस्थ, प्रशासन, तसेच ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे API डॉ. प्रवीण दाईगडे व हवालदार नवनाथ कुंभार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. या बैठकीत बोलताना API डॉ. दाईगडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन केले. तसेच, धार्मिक विधी नियमांचे काटेकोर पालन करत यंदाचा यात्रा उत्सव रात्री दहाच्या आत संपवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगितले.

यात्रेचे धार्मिक कार्यक्रम शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी पहाटे अभिषेकाने सुरू होतील. सकाळी मानाचे दंडस्थान केले जाईल, तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत देवीचा भंडारा होईल. परिसरातील देवता, सासनकाठी आणि पालख्यांचे आगमन शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ११ या वेळेत पालखी सोहळा छबीना होणार आहे. यात्रा कमिटीने सर्व धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन केले आहे.