सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांचे निकाल आज जाहीर होणार
कराड | कृष्णाकाठ वृतसेवा : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील १०९ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मतमोजणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मातब्बर उमेदवारांमध्ये चुरस वाढल्यामुळे काही तासांत हाती येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाई मतदारसंघात २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी
वाई विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक ५ येथे सुरू झाली आहे. एकूण ४७१ मतदान केंद्रांची मोजणी २४ फेऱ्यांमध्ये होणार आहे. ईव्हीएमसाठी २० टेबल्स, टपाली मतांसाठी ६ टेबल्स, आणि सैनिकी मतांसाठी ३ टेबल्स ठेवण्यात आले आहेत.
फलटणमध्ये २६ फेऱ्यांत मतमोजणी
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी फलटण येथील शासकीय धान्य गोदामात सुरू आहे. पोस्टल मतांची मोजणी १० टेबल्सवर आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी ५ टेबल्सवर होत आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी १४ टेबल्सवर एकूण २६ फेऱ्या पार पडणार आहेत.
साताऱ्यात ४० टेबल्सवर २४ राउंडमध्ये मतमोजणी
सातारा विधानसभा मतदारसंघातील एकूण २ लाख १७ हजार ७०० मतदारांचे निकाल २४ राउंडमध्ये लागणार आहेत. टपाली मतमोजणीसाठी प्रक्रिया सुरू असून त्यानंतर ईव्हीएमची मोजणी अर्ध्या तासांत सुरू होईल.
कराड उत्तर: १४ टेबल्सवर मतमोजणी
कराड उत्तर मतदारसंघासाठी १४ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ईव्हीएममधील मतांची मोजणी १४ टेबल्सवर केली जात आहे.
कराड दक्षिण: २० टेबल्सवर १७-१८ फेऱ्यांत मतमोजणी
कराड दक्षिण विधानसभा मतमोजणीसाठी २० टेबल्स ठेवण्यात आले असून १७ ते १८ फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होईल.
माण मतदारसंघात १९ फेऱ्यांत मतमोजणी
दहिवडी येथील शासकीय गोदामात माण-खटाव मतदारसंघातील मतमोजणी सुरू आहे. ईव्हीएमसाठी २० टेबल्स ठेवण्यात आले असून प्रक्रिया १९ फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल.
पाटण विधानसभा मतमोजणीसाठी १८ टेबल्स
पाटण मतदारसंघाची मतमोजणी समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात होत आहे. पोस्टल व सैनिकी मतांची मोजणी सुरू असून ईव्हीएमसाठी १८ टेबल्स ठेवण्यात आले आहेत.
कोरेगाव मतदारसंघ: सर्वांचे लक्ष लागले
सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात झाले असून येथे दोन प्रतिस्पर्धी आमदारांमध्ये चुरस आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे, आणि निकालाची प्रतीक्षा ताणली गेली आहे.