हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा: सुषमा अंधारे

कराड येथील भव्य महिला मेळाव्यात सुषमा अंधारे यांचे आवाहन.

कराड दक्षिण महाविकास आघाडीच्या महिला मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे, समोर उपस्थित जनसमुदाय.

कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

कमळ हे दलदलीत उगवते. कराडचा भाग सखल असल्याने इथे कमळ कधीच उगवलेले नाही. आपल्या हितासाठी आपल्याला कराडची संस्कृती हलवू द्यायची नाही. हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा. कराड दक्षिणेची जनता पृथ्वीराज बाबांच्या रूपाने राज्याचे नेतृत्व निवडत आहे. असे सांगून निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना माजी मुख्यमंत्री एवढे शांत आहेत. पण दोनवेळा पडलेला समोरचा माणूस पैशाच्या जोरावर एवढ्या उड्या मारतोच कसा? दोन-तीन वेळा पडून सुद्धा एवढा पैसा येतो कुठून? असा सवाल करत समोरच्या उमेदवाराला पडायचा लयं नाद असेल, तर त्याचा नाद पुरा करा. तीनवेळा पडले त्यांना चौथ्यांदा पाडा. असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. 

कराड तालुका महाविकास आघाडीच्या भव्य महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. आ. पृथ्वीराज चव्हाण, सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, तालुकाध्यक्षा विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, रेठरे बुद्रुकच्या अर्चना अविनाश मोहिते यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

त्या म्हणाल्या, एकीकडे महाविकास आघाडी तुमच्या - आमच्या विकासाचे बोलत आहे. आणि दुसरीकडे महायुतीचे नेते मतदारांना धमकावत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांना धमकी दिली. याचा नीट विचार करा. महाडिक किंवा भाजपच्या नेत्यांनी बापजाद्यांची जमीन विकून महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले आहेत की, त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तापोळ्याची जमीन विकली. सरकारी योजनेवर हे कशासाठी मिरासदारी करत आहेत. महायुती महिलांना मतांचे आमिष दाखवण्यासाठी योजना राबवत आहेत का? असेच वाटत आहे.

त्या म्हणाल्या, प्रत्येक महिलेच्या लग्नाच्या मंडपात व स्वागत कमानीवर तिच्या घरच्यांनी कधी पोस्टर लावले का, आपल्या भावांनी ते केले नाही. भावाने बहिणीला दहा, पाच हजार दिले म्हणून पोस्टर लावला का, कारण तेथे त्यांना बहिणीच्या नात्याची मर्यादा कळली होती. बहिणीच्या गरीबीची टिंगल त्यांनी केली नाही. आमचा भाऊ पोस्टर लावत नाही. पण महायुती सरकारने लाडक्या बहिणीच्या १५०० रुपयांसाठी २० लाख रुपयांचे पोस्टर लावले. 

त्या म्हणाल्या, जाहिरात वाईट गोष्टींची असते. वाईट विचारांच्या लोकांना वारंवार जाहिरात करावी लागते. ओरिजनल असतात त्यांना काही बोलायची गरज लागत नाही. 

त्या म्हणाल्या, महिलांचा अपमान करण्याची परंपरा फडणवीस यांनी घालून दिली. फडणवीस यांची नजर कराडवर पडली आहे. कराडला गिळण्यासाठी त्यांनी एक कळसूत्री बाहुली उभी केली आहे. कराडला त्यांना नासवायचे. ते धार्मिक दंगली व जातीभेद करतील, हेही ओळखा.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी लाडकी बहिण योजनेचे विधानसभेतील भाषणात स्वागतच केले होते. पण त्यामध्ये महत्वाचे बदल सुचवणे आवश्यक होते ते सुचविले आणि त्यानुसार सरकारने बदल केले त्याचा राज्यातील जनतेला फायदा झालाच. कर्नाटकातील आमच्या काँग्रेसच्या सरकारने ही योजना आधीच सुरू केली आहे. राज्यातील महायुती सरकारला लोकसभेतील पराभवानंतर लाडकी बहिण योजना आठवली. 

विनयकुमार सोरके, शारदा जाधव, अर्चना मोहिते, वैशाली जाधव यांची भाषणे झाली. विद्याताई थोरवडे यांनी प्रास्ताविक केले. गीतांजली थोरात यांनी आभार मानले.