ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेले मोबाईल परत देण्यासाठी ढेबेवाडी पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवली असून, यामध्ये त्यांना मोठे यश मिळाले आहे. नुकतेच नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण डाईंगडे यांनी पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर या मोहिमेला चालना दिली.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा अपर अधीक्षक डॉ. वैशाली कुडकर, पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले. पथकातील अंमलदारांनी सी.ई.आय पोर्टल आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर करून हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेतला. अत्यन्त चिकाटीने आणि अथक परिश्रमांनी करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण २३ मोबाईल फोन, ज्यांची अंदाजे किंमत ३,६०,००० रुपये आहे, हस्तगत करण्यात आले.
हे मोबाईल फोन मूळ मालकांना ४ ऑक्टोबर रोजी ढेबेवाडीचे API डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या हस्ते परत करण्यात आले. यावेळी API डॉ. प्रवीण डाईंगडे यांनी चोरीच्या अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी भविष्यात विशेष मोहीम राबवण्याचे आश्वासन दिले.
सदर मोहिमेत ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे API डॉ. प्रवीण दाईंगडे, पो.उ.नि. भोसले, हवालदार मुळगावकर, नवनाथ कुंभार, अजय माने, दोडके, सायबर पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार, अशोक निकम, सौरभ कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अश्विन माने यांनी सहभाग घेऊन परिश्रम घेतले.ढेबेवाडी पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईलची यशस्वीरीत्या शोध मोहिम राबवून पोलीस ठाण्याने नागरिकांचा विश्वास जिंकला आहे, आणि अशा प्रकारच्या कार्यवाहीमुळे पोलीस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.