सतत बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रवाहाला सामोरे जाण्यासाठी अभियंत्याने नवनवीन ज्ञान आत्मसात करणे आवश्यक : डॉ स्वानंद कुलकर्णी


घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे नूकतेच आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. स्वानंद कुलकर्णी बोलत होते 

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले आजच्या जगात तंत्रज्ञान फक्त नव्या गोष्टी नव्हे तर उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणणारे घटक आहेत. रोबोटिक्समुळे उत्पादन प्रक्रियेत अचूकता वाढली आहे कामाचा वेग वाढला आहे आणि मनुष्यबळाची आवश्यकता कमी झाली आहे. भविष्यात या क्षेत्रांमध्ये जबरदस्त संधी आहेत आणि या बदलत्या तंत्रज्ञानाच्या वेगाशी सामोरे जाण्यासाठी अभियंत्यांना तयार राहावे लागेल.

तसेच इलेक्ट्रिकल व्हेइकल्स (EVs) हे स्वच्छ, हरित पर्याय आहेत जे पेट्रोल-डीझेल गाड्यांना पर्याय म्हणून उदयास आले आहेत. या तंत्रज्ञानाचे भविष्यातील व्याप्ती बघता, अभियंत्यांना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान यासंदर्भात अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

याशिवाय, डॉ. कुलकर्णी यांनी बदलत्या जगातील अभियंत्यांची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की अभियंत्यांना फक्त तांत्रिक कौशल्य पुरेसे नाही तर नव्या तंत्रज्ञानाच्या सतत बदलणाऱ्या प्रवाहाला सामोरे जाण्यासाठी अद्यावत ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे.

यावेळी मेकॅनिकल आणि मेकॅट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा.भारत भोसले यांनी शिस्त आणि सातत्याचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवांमधून प्रेरणा दिली.



जनरल सायन्स विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका शितल औटे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून अभियांत्रिकीच्या प्रवासाची सुरुवात कशी उत्साहाने करावी, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रा. पूनम यादव यांनी नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 बद्दलही विद्यार्थ्यांना माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मान्यवरांचे आभार प्रा.सेजल पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.