दौलतनगर | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" दुप्पट-तिप्पट रकमेने वाढविण्याची घोषणा केली आहे. या योजनेवर विरोधक कितीही टीका करत असले तरीही सरकार ही योजना बंद करणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी बहिणींना या योजनेमागे एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. शिंदे हे पाटण मतदारसंघात आयोजित २८९ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थित विराट समुदायामुळे नामदार शंभूराज देसाई यांचा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजय निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि रविराज देसाई यांचीही उपस्थिती होती.
उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टोला
शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी सरकार काम करत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. "आमचे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर थेट जनतेत जाऊन काम करणारे आहे," असे सांगून त्यांनी विरोधकांच्या टीकांना उत्तर दिले.
विकासकामांत महाराष्ट्र एक नंबर
राज्यात उद्योग आणि विकास क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असून, एक रुपयात पीक विमा देणारे देशातील एकमेव राज्य असल्याचा अभिमान शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधक केवळ टीका आणि आरोप करण्यातच गुंतलेले आहेत, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.
पाटणमधील विकासाची गंगा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघात केलेल्या विकास कामांचे कौतुक करत मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. यामुळे धनगर समाजाच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार
मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सिंधुदुर्गात लवकरच उभारण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कौतुक करत, त्यांनी पाटणमध्ये उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे महत्त्व अधोरेखित केले.
३२ गावांचा शिवसेनेत प्रवेश
कार्यक्रमात पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे गटाच्या ३२ गावांतील सुमारे ७०० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या सर्वांचे स्वागत केले.