खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २१ दिवसांनी अटक - स्थानिक गुन्हे शाखा व कराड पोलिसांचे यश



सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा: खुनाच्या गुन्ह्यातून २१ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा व कराड तालुका पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कराड तालुक्यातील कुसूर गावात घडली होती. दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी शिवाजी लक्ष्मण सावंत (वय ५२) हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर दिनांक ५ सप्टेंबर रोजी कोळेवाडी येथील शिवारातील भुईमुगाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने सातारा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर आणि कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे स.पो.नि सुधीर पाटील, स.पो.नि रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर व पोलिस उपनिरीक्षक सचिन भिलारे यांच्या विशेष पथकांनी तपास सुरू केला.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी स्थानिक माहितीचा अभ्यास केला. तांत्रिक तपासाद्वारे कुसूर येथील दिलीप कराळे यांच्यावर संशय आला. चौकशीत दिलीप कराळे यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. अधिक विचारपूस केल्यानंतर दिलीप कराळे यांनी आर्थिक वादातून शिवाजी सावंत यांचा खुन केल्याची कबुली दिली. या प्रकरणात विळयासारख्या धारदार शस्त्राचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले.

सदर कारवाईत श्री. समीर शेख, डॉ. वैशाली कडुकर, अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरूण देवकर, महेंद्र जगताप, सपोनि सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, सचिन भिलारे, आणि त्यांचे सहकारी अंमलदार यांनी मोलाचे योगदान दिले. या यशस्वी कारवाईसाठी सातारा पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.