कुंभारगाव तालुका पाटण येथील श्री सिद्धनाथ मित्र मंडळ पवारवाडी- शेंडेवाडी या गणेश मंडळाचे यावर्षीचे बारावे वर्ष आहे.या गावात बारा वर्षांपूर्वी घरगुती बसवले जाणारे गणपती बंद करून संपूर्ण गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना सुरू झाली. मंडळाच्या वतीने एकच सार्वजनिक गणपती उत्सव सुरू आहे. त्यामुळे मोठ्या जल्लोषात गणपती उत्सव साजरा केला जातो.
दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात यामध्ये गावात स्वच्छता राखणे मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे वृक्षारोपण करणे अशी समाजोपयोगी कामे केली जातात.
नुकतेच मंडळाचे सदस्य समाजसेवक सचिन पवार यांनी त्यांचे वडील कै. बापूराव पवार यांच्या स्मरणार्थ 60 वर्षावरील गावातील सर्व महिलांना स्वेटर चे वाटप केले. तसेच शेंडेवाडी आणि जांभूळवाडी शाळातील मुलांना शालेय वस्तू वाटप करण्याचे आयोजन केले आहे. तसेच येथील पोलीस पाटील संतोष पवार यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ गावातील वृद्धांना बसण्यासाठी सिमेंटची बाके देणगी म्हणून दिलेली आहेत.
या मंडळाचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे कोणतेही वाद्य किंवा डीजे, गुलाल याचा वापर न करता गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक करण्यात येते. पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळातून मिळणाऱ्या देणगीतून विविध समाज उपयोगी कामे दरवर्षी करण्यात येतात.