जागृती गणेश मंडळाचा 50 वा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: जागृती गणेश मंडळाची स्थापना 1974 साली कै. रामचंद्र देवळेकर, पांडुरंग उरुणकर, धोंडीराम कचरे, धोंडीराम कोकीळ, गणपती कचरे, सुभाष मोहिरे, बाळकृष्ण सांगावकर, बाळकृष्ण स्वामी, किसन स्वामी, शांताराम तवटे, बाळकृष्ण तवटे, रुस्तुम तवटे, बबन तवटे, वसंत नरुले, चंद्रकांत आंबेकर आणि इतर सदस्यांच्या प्रयत्नातून करण्यात आली.

यंदा मंडळाच्या 50 व्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक, सामाजिक, आणि शैक्षणिक उपक्रम राबवले गेले. 

ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवी मंदिराच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले , तसेच रांगोळी स्पर्धा, मुलांची लिंबू-चमचा शर्यत, मिमिक्री, नृत्य स्पर्धा, आणि धार्मिक अथर्वशीर्ष पठण यासारखे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. याशिवाय, समाजोपयोगी उपक्रमांच्या अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. 

विशेष म्हणजे, रोटरी क्लब मलकापूर आणि जागृती गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रक्तदात्यांना प्रशस्ती पत्र, स्मार्ट वॉच, आणि मोबाईल हेडफोन देऊन सन्मानित करण्यात आले.

प्राना फाऊंडेशनच्या डॉ. प्राची पाटील यांनी मंडळाला सदिच्छा भेट दिली आणि आयोजित उपक्रमांचे कौतुक केले. याशिवाय, जिजाऊ अनाथ आश्रम, कोळे येथे शालेय साहित्य आणि धान्याचे वाटप करण्यात आले. श्री लक्ष्मीदेवी हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित करून विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाच्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत असून, मंडळाचे अध्यक्ष रमेश तवटे उपाध्यक्ष नारायण सावेकर, सदस्य रामचंद्र स्वामी, शाम स्वामी, सतीश तवटे, नंदकुमार खटावकर, माणिक खटावकर, महेश सांगावकर, राजेंद्र नरुले, बाळू लोकरे, संतोष लोकरे, मनोज कचरे, विजय कचरे, दत्ता सावे कर, जीवन स्वामी, स्वप्नील उरुणकर, अनिल सांगावकर, किशोर सांगावकर आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.