शिबेवाडीच्या डोंगरावरील माता काळंबा देवीचा वार्षिक भंडारा मंगळवारी

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील गुढे ग्रामपंचायत हद्दीतील वरची शिबेवाडी (डोंगरावरील) जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या माता काळंबादेवीचा वार्षिक भंडारा जत्रोत्सव मंगळवार दि.27 ऑगस्ट, 2024 रोजी धुमधडाक्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.

वरची शिबेवाडी (डोंगरावरील) हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री काळंबादेवी मातेचा वार्षिक भंडारा दरवर्षी गोपाळकाला दिवशी साजरा केला जातो. त्यानिमित्त या मंदिरात मंगळवार दि.20 ऑगस्ट, 2024 पासून अखंड विना व हरिनाम सप्ताह सुरु आहे. या पारायण सोहळयात दररोज काकड आरती, हरीपाठ, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

अखंड विना व हरिनाम सप्ताहाचे व्यासपीठचालक ह.भ.प.रामचंद्र नाथा शिद्रुक (भाऊ) हे आहेत. मंगळवार दि.20 ऑगस्ट, 2024 रोजी ह.भ.प.रामचंद्र महाराज वरची शिबेवाडी, बुधवार दि.21 ऑगस्ट रोजी ह.भ.प.संपत महाराज मान्याचीवाडी, गुरुवार दि.22 ह.भ.प.विजय महाराज मालदनकर, शुक्रवार दि.23 ऑगस्ट रोजी ह.भ.प.शिवाजी महाराज मत्रे, शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी ह.भ.प.सचिन महाराज सोनसळकर, रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी ह.भ.प.बाबुराव भोसले महाराज मस्करवाडी, सोमवार दि.26 ऑगस्ट रोजी ह.भ.प.संगिता महाराज येनपुरे यांची कीर्तने सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होतील. तर मंगळवार दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1 पर्यंत गोपाळकाल्याचे कीर्तन होईल.

मंगळवार दि.27, ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 11 ते 2.30 महाप्रसाद व दुपारी 2.30 ते 4.30 काल्याचे कीर्तन होईल. दही हंडी फोडून परत महाप्रसाद चालू राहील. याशिवाय दिवसभरात देवीची पालखी मिरवणूकीचा कार्यक्रम संपन्न होईल. दि.26 व 27 या दोन दिवसातील सर्व कार्यक्रमांचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे.

दुपारी शिवरीच्या माळावर पाचुपतेवाडी  येथील हनुमानाची पालखी आल्यानंतर दोन्ही पालख्यांची भेट होवून पालख्यांनी मंदिराची प्रदक्षिणा घातल्यानंतर दहीहंडी फोडली जाते. त्यानंतर महाप्रसाद वाटप होतो. या दिवशी मेघराजा हमखास हजेरी लावतो असे म्हणतात. त्यावेळी पावसातही भाविक मोठया आनंदाने महाप्रसाद घेण्यासाठी रांगा लावतात. या भंडारा उत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईतील देवीचे भाविक हमखास हजेरी लावतात. अत्यंत शांततेत एकोप्याने हा भंडारा उत्सव होत असतो. या उत्सवाची लोक आवर्जून वाट पाहतात.

सात दिवस काकड आरती व हरिपाठ रामचंद्र शिद्रुक, निवृत्ती दळवी, संपत शिद्रुक, शहाजी शिद्रुक, चंद्रकांत लोहार व मालन महापुरे, विणेकरी प्रकाश बाबुराव शिबे पुजारी, हार्मोनियम मोडक शेठ, भगवान लोहार, तबला शांताराम मोरे, मृदंगमणी सचिन लोहार कुंभारगाव तर चोपदार ह.भ.जगन्नाथ शेवाळे हे आहेत.

दरम्यान शिवसमर्थ सांप्रदायिक भजनी मंडळ व पाचुपतेवाडी, शिद्रुकवाडी, दळवीवाडी, वायचळवाडी, जाधववाडी, जुळेवाडी, कुठरे, शिबेवाडी वरची व खालची, गुढे, दिंडेवाडी, मान्याचीवाडी, ताईगडेवाडी तळमावले, शिबेवाडी कुंभारगांव, बागलवाडी काढणे, मान्याचीवाडी, करपेवाडी, पाटीलवाडी, उल्हासनगर भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळ साथ करतील.

तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक, ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ शिबेवाडी (वरची) गुढे, श्री काळंबादेवी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले आहे.