विधानसभेपूर्वी राज्यात घडामोडींना वेग!
काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जालना इथं आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता चव्हाण यांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात उघड भूमिका घेत अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पाडण्याचं आवाहन केलं होतं. जरांगे पाटील यांच्या या आवाहनाचा मराठवाड्यात मोठा परिणाम दिसून आला. मराठवाड्यातील आठ जागांपैकी सात जागांवर महायुतीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. मात्र आता जरांगे यांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्याने महायुतीसह महाविकास आघाडीच्या गोटातही अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेली जरांगे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी स्वतंत्रपणे उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर नाराज झालेल्या घटकांची मते विभागली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.