रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जयवंत अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. अनंतकुमार जोतीराम गुजर यांची निवड करण्यात आली असून त्यांनी नुकताच प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
प्रा. डॉ. अनंतकुमार गुजर यांचे महाविद्यालयीन शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड व पीएचडीचे शिक्षण अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथून प्राप्त केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व महाविद्यालयीन प्रशासन कामाचा एकूण 28 वर्षाचा अनुभव आहे. डॉ. गुजर यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकात 42 हूण अधिक संशोधन लेख प्रसिद्ध केले आहेत. तसेच त्यांची यंत्र अभियांत्रिकी विषयातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या नावावर तीन हून अधिक पेटंट व कॉपीराईट डिझाइन्स प्रकाशित झाली आहेत.
डॉ. गुजर पदव्युत्तर शिक्षक व पीएचडी चे मार्गदर्शक म्हणून काम करत असून आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या यंत्र अभियांत्रिकी अभ्यास मंडळावर तसेच विद्यापीठाने नियुक्त केलेल्या विविध समित्यावर त्यांनी काम पाहिले आहे. विविध अन्य स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यास व अधिकार मंडळावर सदस्य म्हणून काम पाहत असून नॅक व एन बी ए मानांकन समिती प्रमुख पदाचा त्यांना अनुभव आहे. प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. गुजर म्हणाले की, संस्थेच्या ध्येयधोरणानुसार व संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व सहकाऱ्यांच्या साथीने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाविद्यालयाला सर्व स्तरावर प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून आगामी काळात नॅक मूल्यांकनासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
त्यांच्या या निवडीबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेशबाबा भोसले, मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. अतुलबाबा भोसले, प्रधान सल्लागार डॉ. विनोद बाबर, तसेच संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.