माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ४२ लाख रु. इतका संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : वारुंजी हे नदीकाठी वसलेले गाव असून येथे पुरामुळे लोकवस्तीला धोका निर्माण होत असतो. यामुळे याठिकाणी संरक्षक भिंतीची गरज लक्षात घेऊन तसेच स्थानिकांची मागणी लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ४२ लाख इतका निधी राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे. 

वारुंजी गावाला व परिसराला पुरापासून संरक्षण मिळणार आहे. या आमच्या गावकऱ्यांच्या मागणीची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून संरक्षण भिंतीसाठी ४ कोटी ४२ लाख इतका भरघोस निधी मिळवून दिला आहे याबद्दल आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे वारुंजी ग्रामस्थांकडून मन:पूर्वक आभार मानतो. अशी प्रतिक्रिया माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील यांनी दिली आहे. तसेच ते पुढे म्हणाले कि, वारुंजी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची कायमच साथ मिळाली आहे. त्यांनी गावाला आतापर्यंत भरघोस तसेच कोट्याबधी रुपयांचा निधी दिल्याने गावातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावता आले आहेत. 

वारुंजी हे गाव कृष्णा व कोयना च्या प्रीतिसंगमापासून अत्यंत जवळ असल्याने व नदीस वारंवार येणाऱ्या पुरामुळे नदीकाठची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. नदीकाठच्या जमिनीची धूप होऊन वस्ती लगतचा नदीकाठ व भूभाग अस्थिर होत असल्यामुळे पुराच्या पाण्यापासून कोयना नदी काठी वसलेल्या गावठाणच्या भागाचे रक्षण करण्याकरिता पूर संरक्षक भिंतीचे काम करून मिळणेबाबत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती तसेच विधानसभेत सुद्धा प्रश्न मांडला होता. त्यानुसार वारुंजी येथील कोयना नदीकाठी पूर संरक्षक भिंत बांधकामाच्या प्रस्तावास राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी ४ कोटी ४२ लाख ९८ हजार ७०० रुपये एवढ्या खर्चासाठी मान्यता देण्यात आली आहे.