काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रात टोलविरोधी आंदोलन : आ. पृथ्वीराज चव्हाण


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग वर महामार्ग रुंदीकरनाचे काम सुरु असून रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत त्यामुळे प्रवासाला वेळ लागत आहे. असे खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात असल्याने जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा यासाठी मोठं जनआंदोलन उभं केलं जाणार आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एका एका टोल नाक्यावर उभं राहून जनआंदोलन करणार आहेत. आपआपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरतील. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. 

काँग्रेसकडून टोल नाका परिसरात आंदोलन करण्याचे नियोजन आहे. टोल नाका बंद पाडून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत. शनिवारी 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजता पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात कोल्हापूरसह किणी, तासवडे कराड , सातारा मधील आनेवाडी, पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर आंदोलन केलं जाणार आहे. रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाल्याने काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी काँग्रेस नेते आ. सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते आ. संग्राम थोपटे, आ. संजय जगताप, आ. विक्रम सावंत यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.

 कोणत्या नेत्याकडे कोणत्या टोलची जबाबदारी?

कोल्हापूरच्या किणी टोल नाका येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.विश्वजीत कदम आणि उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराडमधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील. सातारा जवळच्या आनेवाडी टोल नाक्यावरती सातारा जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजित देशमुख, राजेंद्र शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा या तालुक्यातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सहभागी होतील. पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते आ.संग्राम थोपटे आ. संग्राम जगताप यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.