घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा विठू नामाच्या गजरात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय व भक्तिमय वातावरणात शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळाही रंगला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही घोगाव येथील श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. तसेच काही मुलांनी विठ्ठल- रखूमाई, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत तुकाराम ,संत मीराबाई, संत कान्होपात्रा व अन्य संतांच्या वेशभूषा केल्या होत्या.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं-मुली आज ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाच्या भक्तीरसात तल्लीन झाली होती. ही वारकऱ्यांची दिंडी श्री संतकृपा संस्थेच्या प्रांगणापासून ते घोगाव मंदिरापर्यंत विठ्ठलाचा जयघोष करत नेली होती. यामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थांनी ही सहभाग घेतला होता. या दिंडी सोहळ्यासाठी श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सुप्रिया पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इंजिंनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, फार्मसी चे प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकार, डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. पुष्पा पाटील तसेच संस्थेच्या विविध महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी फलक, अभंग, नृत्य या माध्यमातून लोकजागृतीचे कार्य केले. सर्वांनी या छोट्या वारकऱ्यांचे कौतुक केले. या दिंडी सोहळ्यातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ उषा जोहरी व सचिव प्रसून जोहरी यांनी विशेष कौतुक केले.