कराडच्या पाणीप्रश्नावर आ. पृथ्वीराज चव्हाण ऍक्शन मोडवर...

पाणी जपून वापरण्याचे कराडकरांना केले आवाहन 

टॅंकरची संख्या वाढवण्यासह पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत होण्यासाठी सुचविले पाच पर्याय.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी उद्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कराडमध्ये आढावा बैठक घेणार.



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कराडच्या पाणीप्रश्नांवरून माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार ऍक्शन मोडवर आले असून त्यांनी प्रांतधिकारी, कराड नगरपालिका, हायवे अधिकारी यांच्यासोबत मिटींग घेवून तात्काळ पर्यायी व्यवस्थेचा आढावा घेतला. यामध्ये कराडकरांना टॅंकरची संख्या वाढवून पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार असून पर्यायी व्यवस्था म्हणून पुलावरून 500 एमएमची नविन पाईपलाईन तात्काळ टाकण्याची सूचना आ. चव्हाण यांनी केली आहे. यासाठी थेट NHAI चे प्रोजेक्ट हेड पंधरकर यांच्यासोबत फोनवरून बोलून इमर्जन्सी परिस्थिती म्हणून पुलावर पाईप टाकण्यासाठी परवानगी देण्यास सांगितले. यासह अन्य पर्यायी मार्गावर अधिकाऱ्यांसोबत बैठकित चर्चा करण्यात आली. 

या बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराड नगरपालिका मुख्याधिकारी शंकर खंदारे, MGP चे अधिकारी, डी पी जैन कंपनीचे अधिकारी, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराडचे माजी उपगराध्यक्ष जयवंतराव पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण, मलकापूरचे माजी उपगराध्यक्ष मनोहर शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, श्रीकांत मुळे, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, राजापूरे, संजय ओसवाल, साहेबराव शेवाळे, गणेश गायकवाड आदीसह कराड शहरातील काही नागरिक यावेळी उपस्थित होते.



कराड शहराला वारूंजी येथून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन कोयना पूलाजवळून नदीतील पाण्याच्या खालून गेली आहे. सदरील पाईपलाईन नादुरूस्त झाल्याने शहराला गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. सध्या काही ठिकाणी टॅंकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिका तसेच डी. पी. जैन कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत मिटींग घेतली. यावेळी पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरच्या वतीने पाणीपुरवठा सुरू असून टॅंकरची संख्या वाढण्याची सूचना केली. हायवेचे काम करणाऱ्या कंपनी चे अधिकारी पाईप टाकून बांध घालून देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाणीयोजना दुरूस्त होण्यासाठी जास्त कालावधी लागणार असल्याने आवश्यक ती उपययोजना झाली नाहीतर परिस्थिती बिकट होऊ शकते. ज्या ठिकाणी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्याठिकाणी पाणी टँकर तात्काळ पाठवावेत. गरिब वसाहतीत पहिल्यांदा पाणी टॅंकर पाठवण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी टँकरची नोंदी करून विभागवार टँकर नियोजन केले जावेत. 

 पृथ्वीराज बाबांनी सुचवलेले प्रमुख पर्याय :

1. सद्य परिस्थितीत शहराला तात्काळ टँकरने पाण्याची व्यवस्था व ती संख्या वाढविणे व त्याचे वॉर्ड निहाय नियोजन करणे. 

2. जुनी पाणीपुरवठा योजना चालू करणे. 

3. जी पाईप तुटली आहे तिथे नवीन पुलावरून पाण्याची पाईप काही महिन्यासाठी सुरु करणे.

4. कराड शहरात शुक्रवार पेठेतील जुने वाॅटर हाउस पुन्हा चालू करणे

कराड शहराला पाण्यातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सध्या विस्कळीत झाली असून सुरळीत होण्यासाठी कोयना पुलावरून 500 एमएमची पाईप टाकून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. मात्र त्यासाठी हायवेचे प्रोजेक्ट हेड श्री. पंधरकर यांची परवानगी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा तात्काळ आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून संपर्क साधत पुलावरून पाण्याची पाईप लाईन नेण्याची व्यवस्था करण्यासाठी इमर्जन्सी अॅक्सन घेण्याची सूचना केली. 

जिल्हाधिकाऱ्यांना बाबांच्या फोनवरून सूचना:

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरातील पाणी प्रश्नाने उद्भवलेल्या परिस्थिती करिता तात्काळ प्रांतधिकारी, MGP व कराड नगरपालिका मुख्याधिकारी या सर्वासोबत मिटिंग घेतली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना फोनवरून केल्या.

जुन्या योजनेतून निम्म्या कराडकरांना लवकरच पाणीपुरवठा:

पंकज हाॅटेलच्या पाठीमागे असलेली जुनी स्कीम सुरू करण्यासाठी पालिककेडून युध्दपातळीवर काम सुरू असून त्याचाही आढावा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. या पाणीयोजनेतील गाळ काढून टेस्टींगचे काम सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या टीम काम करत आहेत. आज मंगळवार (16 जुलै) रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत टेस्टींग पूर्ण होवून 8 वाजेपर्यंत पाणी योजनेतील टाकीत साठवले जाईल. त्यानंतर मध्यरात्री किंवा उद्या सकाळपर्यंत कराडमधील 50 ते 70 टक्के भागापर्यंत पाणी पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी सांगितले.