विठुरायाच्या दारी आदर्शच्या चिमुकल्यां वारकऱ्यांची वारी


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श शिशुविहार व आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर मध्ये दिंडी सोहळा म्हणजे जीवनाचे सार दिंडी सोहळा म्हणजे एक संस्कार ही उक्ती सार्थ ठरवत दिंडी सोहळ्याचे आयोजन शनिवार दि.१३जुलै २०२४ रोजी करण्यात आले .पथक पर्यवेक्षण प्रमुख रामचंद्र कुंभार यांच्या शुभहस्ते माऊलींच्या प्रतिमेची पूजन करूनप्राथमिक स्वरूपात श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला.विद्यालयाच्या प्रांगणातून दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होऊनश्री दत्त मंदिर आगाशिवनगर पर्यंत दिंडी काढण्यात आली.यावेळी संपूर्ण आगाशिवनगर मध्ये जणू पंढरी अवतरली होती असेच काही चित्र पहावयास मिळाले. विद्यालयातील बाल वारकऱ्यांचा उत्साह ,टाळमृदुंगाचा आवाज,शिशु गटातील मुला मुलींनीतर पावसाची तमा न बाळगता दिंडीत उत्स्फुर्त भाग घेतला. शाळेचा संपूर्ण परिसर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या भक्तिमय नादाने बहरून गेला.

         राम आणि कृष्ण यांच्या पवित्र देशात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणून अनेक संत महंतांनी समाज प्रबोधन केले .महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या महाराष्ट्राच्या पवित्र मातीलाअनेक संत महंतांचा गौरवशाली इतिहास आहे.या संत परंपरेचे विद्यार्थ्यांना दर्शन व्हावे. सण ,उत्सव,परंपरा ,संस्कृती यांची ओळख व्हावी, समाजात बंधूभाव व एकोपा वाढावा व राष्ट्रीय मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावीत यासाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था मळाई संकुलातील शाळांमध्ये असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. असे मत विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक सचिन शिंदे यांनी व्यक्त केले. 



       विविध साधूसंतांचे पोशाख परिधान करून. विविध अभंग, ओव्या,भजन यांचे सादरीकरण केले तसेच विठू माऊली चरणी प्रवचनात्मक अभिवादन करून माऊली-माऊली या गीतावरती नृत्याविष्कारचे सादरीकरण करण्यात आले. सुमन मेडिकलचे प्रोप्रा.सागर जाधव यांनी सर्व बाल वारकऱ्यांना खाऊचे वाटप केले सर्व विद्यार्थ्यांना गोड खीर खाऊ घालून दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली. सर्व दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख-सौ.प्राजक्ता पाटील ,सौ.कोमल शिर्के यांच्यासह शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले.

        आदर्श विद्यालयाच्या या उपक्रमाचे संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ), अध्यक्ष पांडूरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक वसंतराव चव्हाण, सौ.स्वाती थोरात, संजय थोरात व पालकांनी कौतुक केले.