रोटरी क्लब ऑफ कराड चा पदग्रहण सोहळा उत्साहात: रोटरी कला प्रदर्शनाचे उद्घाटन
कराड: रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना मानपत्र प्रदान करताना रो. रामचंद्र लाखोले, रो.आनंदा थोरात, रो.बद्रिनाथ धस्के, रो.शिवराज माने,रो. राजीव रावळ.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : बदलत्या युगामध्ये आणि धावत्या जगामध्ये आपण डिजिटल तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत. डिजिटल तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे, तितकेच योग्य काळजी न घेतल्यास ते घातक ही आहे. विशेषतः या डिजिटल साधनांचा वापर करताना डोळ्याची सुरक्षितता जपणे आवश्यक असल्याचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी सांगितले.
स्व.यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) येथे रोटरी क्लब ऑफ कराड चा 68 वा पदग्रहण सोहळा तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी चा पदग्रहण सोहळा व रो.डॉ.अस्मिता फासे निर्मित प्रतिबिंब रोटरी कला प्रदर्शनाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ते डिजिटल साधनांचा वापर व डोळ्यांचे आरोग्य या विषयावरती बोलत होते. या कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर रो. राजीव रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराड चे नूतन प्रेसिडेंट रो.रामचंद्र लाखोले यांनी मावळते प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के यांच्याकडून पदभार स्वीकारला. नूतन सेक्रेटरी रो.आनंदा थोरात यांनी मावळते सेक्रेटरी रो.शिवराज माने यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडचे सर्व डायरेक्टर यांनीही पदभार स्वीकारला. या कार्यक्रमांमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी प्रेसिडेंट रो.अजीम कागदी, सेक्रेटरी रो. प्रथमेश कांबळे व संचालक मंडळाने आपला पदभार स्वीकारला.
आपल्या संघर्षपूर्ण जीवन प्रवासाची केलेली वाटचाल सांगताना संकटावरती मात करूनच आपण यशस्वी होतो असे सांगत डॉ.लहाने म्हणाले, आपण संकटे आणि समस्या याचा बाऊ न करता त्याला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आज मोबाईल आणि संगणक याचा वापर करताना सुरक्षितता न बाळगल्याने अनेक गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संगणक असो किंवा मोबाईल असो याचा वापर करताना आपण किमान 45 सेंटीमीटर अंतर ठेवणे गरजेचे आहे. डोळ्यांच्या पापण्यांची ठराविक वेळेत उघड झाप झाली पाहिजे. गरज असेल तरच मोबाईलचा वापर करावा. मोबाईल असो किंवा अन्य डिजिटल साधने यांच्या असणाऱ्या लहरी याचा परिणाम ही आपल्या आरोग्यावरती होत असतो, त्यामुळे आपण योग्य ती काळजी घेणे, हे आपल्या आरोग्य हिताचे आहे.
कार्यक्रमात असिस्टंट गव्हर्नर रो.राजीव रावळ यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू यांचा संदेश सांगत रोटरी क्लब ऑफ कराडचे आणि त्यांनी निर्माण केलेल्या विविध क्लबचे काम प्रेरणादायी असल्याचे सांगतच येथे केलेले प्रकल्प हे दिशादर्शक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात रो.बद्रीनाथ धस्के यांनी गतवर्षात केलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. प्रेसिडेंट रामचंद्र लाखोले यांनी चालू वर्षात राबवण्यात येणाऱ्या उपक्रम व कार्यक्रमाची माहिती देत सर्वांच्या सहकार्याने चांगले काम उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. रो.जयंत जगताप यांनी अमेरिकेतील शिकागो येथील रोटरी इंटरनॅशनल ऑफिसला भेट दिल्यानंतर मिळालेला अनुभव आणि पाहिलेल्या कामाची माहिती देत जगभरात सुरू असलेल्या कामांची माहिती जवळून पाहता आल्याचे सांगितले.
यावेळी पॉल हॅरीस झालेल्या रोटरीयन मेंबरचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वाहगाव येथील दिव्यांग व कर्णबधिर मुलीला कानातील अत्याधुनिक मशीन देण्यात आले. मधुमेह प्रोजेक्ट करत असलेल्या कामाबद्दल डॉ.राहुल फासे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ कराडचे सन्माननीय सभासद म्हणून अरुण पाटील व डॉ.अनिल देसाई यांना पत्र देऊन सत्कार करण्यात आला. माजी खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी ही पदग्रहण सोहळास शुभेच्छा दिल्या. सेक्रेटरी रो.आनंदा थोरात यांनी आभार मानले. रो.शुभांगी पाटील व रो.किरण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सातारा कॉप्स मधील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
___________________________________
___________________________________
___________________________________