कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या विलासकाका पाटील उंडाळकर प्रवेशद्वाराचे उद्धघटन.
कराड : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर प्रवेशद्वार कमानीचे उद्धघटन करताना आ. पृथ्वीराज चव्हाण, समवेत माजी खा. श्रीनिवास पाटील, उदयसिंह पाटील व मान्यवर.
विलासकाकांनी आपले सामाजिक आयुष्य शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वेचले. काकांचे तेच काम उदयसिंह पाटील जिद्दीने करण्याचा प्रयत्न करत आहेत. विलासकाकांचे शेतकऱ्यांना समर्पित आयुष्य होते. त्यांचे स्मरण व्हावे व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे. कराडच्या बाजार समितीने काकांच्या नावाने उभारलेल्या भव्य प्रवेशद्वार कमानीत प्रवेश केल्यानंतर काकांच्या दृष्टीची माहिती घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेले काम, शेतकऱ्यांचा राखलेला सन्मान, अधिकार व पिळवणूक होवू नये, याकरिता त्यांनी अहोरात्र काम केले. त्यांच्या नजरेसमोर शेतकरी वर्ग होता व तोच त्यांचा केंद्रबिंदू होता. याचे कायम स्मरण ठेवू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर प्रवेशद्वार कमानीच्या उद्धघटन समारंभात ते बोलत होते. माजी खा. श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, अजितराव पाटील - चिखलीकर, बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजी चव्हाण, सर्व संचालक, आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे, निवासराव थोरात, हणमंतराव चव्हाण, अनिल मोहिते, शंकरराव खबाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, प्रवेशद्वार कमानीच्या रूपाने काकांच्या उत्तुंग कार्याची कायम आठवण होईल. कराडची बाजार समिती महाराष्ट्रात अग्रगण्य बाजार समिती म्हणून काम करत आहे. बाजार समित्यांसाठी शासनाच्या विविध कल्पना आहेत. शेतकऱ्यांनीही नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली पाहिजे.
ते म्हणाले, जागतिक उष्णता व हवामानाच्या चक्रात शेती व आपण अडकलो आहोत. हे समजल्याने अधुनिक तंत्रज्ञान व कृषी निविष्ठा वापरण्याचा कल वाढत आहे. भारताला शेतीचे क्षेत्र जास्त आहे. पण उत्पन्न कमी आहे. याचीही कल्पना असावी.
श्रीनिवास पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना सल्ला देणारे केंद्र बाजार समितीने उभे करावे. अधुनिक कोल्ड स्टोरेज हाऊस उभारावे. शेतकऱ्यांच्या हातात माल असताना त्यांना जास्त पैसे कसे मिळतील, याचा प्रयत्न झाल्यास नक्कीच काकांचे कार्य आपण पुढे नेत आहोत. याची प्रचिती येईल.
अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर म्हणाले, विलासकाकांनी नवनवीन संकल्पना राबवत बाजार समितीला राज्यात लौकिक मिळवून दिला. कृषी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने कृषी प्रदर्शन सुरू केले. अनेक अडचणीतून मार्ग काढत बाजार समिती सुस्थितीत आहे. काकांनी घालून दिलेल्या पायावर संस्था कायदा व व्यवहाराची सांगड घालून चालवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या बंधनात राहून आपल्याला काम करावे लागणार आहे. भविष्यात पुरोगामी विचारसरणी टिकावी, यासाठी विलासकाकांच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नावर आपल्याला चालणे गरजेचे आहे. येथूनपुढे विलासकाकांची विचारसरणी व त्यांनी बांधलेल्या संघटनेबरोबर सर्वांनी रहावे.
विजयकुमार कदम यांनी प्रास्ताविकात सर्व संचालक, व्यापारी व सेवकांच्या सहकार्यातून गेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीला ४५७ कोटींची उच्चांकी उलाढाल करता आली. आमच्या संचालक मंडळास बाजार समितीच्या प्रवेशद्वारास विलासकाकांचे नाव देण्याचा पहिला मान आम्हाला मिळाला, याचा अभिमान वाटतो.
माजी कृषी अधिकारी श्री. पटेल, प्रा. धनाजी काटकर यांची भाषणे झाली. विजयकुमार कदम व सर्व संचालकांनी मान्यवरांचे स्वागत केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रकाश पाटील यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते