जेष्ठ नेते भगवानराव विठ्ठल पाटील यांचे दुःखद निधन.

 


ढेबेवाडी विभागातील एक ज्येष्ठ नेता हरपला.

कुंभारगांव| कृष्णाकाठ वृत्तसेवा    
कुंभारगांव ता पाटण येथील सुपुत्र ढेबेवाडी विभागाचे जेष्ठ नेते भगवानराव विठ्ठल पाटील (नाना ) वय ८४ वर्ष यांचे आज सायंकाळी ४:०० वाजता कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. 

काल सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र त्यांच्यावर उपचार चालू असताना सायंकाळी ४:०० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे दुःखद निधन झाले.

भगवानराव पाटील हे नाना या नावाने परिचित होते. सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील ते जाणकार होते. कुंभारगाव जिल्हा परिषद मतदार संघातून त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून त्या काळात ते मोठ्या फरकाने विजयी झाले होते. जिल्हा परिषदेच्या विविध समितीवर त्यांनी प्रभावीपणे काम केले अनेक सामाजिक विकास कामे जिल्हा परिषदेच्या मार्फत कुंभारगाव विभागात साकार केली. सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक वर्ष संचालक अशी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण राजकीय पदे त्यांनी भूषवली होती. कै विलासराव पाटील (काका) उंडाळकर यांचे ते खंदे समर्थक म्हणून त्यांची सातारा जिल्ह्यात ओळख होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी कुंभारगाव विभागाचे नाव विविध स्तरावर जिल्ह्यात अधोरेखित केले होते.

शेवटपर्यंत त्यांनी एकनिष्ठपणे राष्ट्रीय काँग्रेसचे काम केले. त्यांच्या अचानक जाण्याने एक ज्येष्ठ नेता हरपल्याची भावना आज अनेकांनी व्यक्त केली .

 या दुःखद निधनाने कुंभारगांव परिसरात शोककळा पसरली आहे. आज रात्री 10:00 वाजता कुंभारगांव येथील वैकुंठधाम येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.