पाटण| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील डफळवाडी येथील नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे,वनविभागाच्या जमिनीतून रस्ता मिळणे इत्यादी मागणीसंदर्भात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या केंद्रावर एकूण 272 पुरुष व 223 स्त्रियांचे असे एकूण 595 मतदान आहे.
सदर प्रश्नांची वरिष्ठ पातळीवर योग्य ती दखल घेण्यात आली होती व आवश्यक तो पत्रव्यवहार देखील सुरू करण्यात आला होता.यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने गट शिक्षण अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी काल ग्रामस्थांची भेट घेऊन मतदाना वरील बहिष्कार मागे घेणे बाबत विनंती केली होती परंतु ग्रामस्थ मागण्यावर ठाम होते मागण्या पूर्ण झाल्याशिवाय किंवा याबाबत ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय सदर बहिष्कार मागे घेणार नाही यावर ठाम होते.
आज सकाळी पाटण तालुक्यात सर्वत्र मतदान सुरू झालेले असताना डफळवाडी मतदान केंद्रावर मात्र सामसूम होती.
याबाबत शेवटचा प्रयत्न म्हणून जिल्हाधिकारी सातारा श्री जितेंद्र डूडी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यशनी नागराजन यांचे निर्देशानुसार सह निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे व तहसीलदार अनंत गुरव यांनी याबाबत पुन्हा ग्रामस्थांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.स्थानिक पदाधिकारी याना देखील सदर बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले. प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन निवडक ग्रामस्थांची याबाबत पुन्हा बैठक झाली व प्रशासनाने केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन अखेर 6 तासानंतर ग्रामस्थांनी मतदान करण्याचा योग्य असा निर्णय घेतला.
--------------------------------------------------------------------लोकशाहीच्या मजबुती करणासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे.डफळवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन बहिष्कार मागे घेतल्याबद्दल प्रशासन त्यांचे आभारी असल्याचे सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी नमूद केले आहे.
---------------------------------------------------------------------