पाटण |कृष्णाकाठ वृत्तसेवा
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकी साठी 7 मे रोजी मतदान प्रक्रियेसाठी बाळासाहेब देसाई महाविद्यालयातून आज उद्यासाठी होणाऱ्या मतदानासाठी सुमारे 409 पथके 12 वाजेपर्यंत पाटण मधील मतदान केंद्राकडे रवाना झाल्याची माहिती सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.
पाटण मतदारसंघात एकूण 409 मतदान केंद्रासाठी 840 पोलीस व होमगार्ड कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्गम भागातील केंद्रावरील मतदान यंत्रांचा अतिरिक्त सुरक्षेसाठी विशेष काळ्या रंगाची सुरक्षा बॅग पुरविण्यात आली आहे.
409 मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी म्हणून 2045 कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. साहित्य वाटप करिता एकूण 42 टेबल लावण्यात आले होते. व त्याकरिता सुमारे 150 महसूल कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय पाटण मधील मतदान केंद्रावर जाणारे कर्मचारी यांना सातारा जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात सोडण्यासाठी 18 बसेस पहाटे पासून रवाना करण्यात आल्या. तसेच पाटण मध्ये बाहेरून देखील 18 बसेस द्वारे मतदान कर्मचारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाटण मध्ये पोहचले होते.
दिव्याग केंद्र(कोंजवडे),युवा केंद्र,( पाटण व कवठेकर वाडी) महिलांचे केंद्र (विहें व पाटण शहर)इत्यादी मतदान केंद्रावरील पथकांना सह निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे व तहसीलदार पाटण यांनी स्वतः साहित्य वाटप करून शुभेच्छा दिल्या. मतदान पथके केंद्रावर पोहचविणे कामी एकूण 47 बसेस व 119 जीप या वापरण्यात आल्या आहे. दुर्गम भागातील केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
साहित्य वाटपाच्या ठिकाणी मतदान कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांची पाणी चहा नाश्त्याची तसेच जेवणाची सोय करण्यात आली होती. याशिवाय मतदान कर्मचारी याना केंद्रावर मुक्काम करावा लागणार असल्याने जीवनोपयोगी साहित्य जसे की कोलगेट,साबण,बिस्कीट पुडे इत्यादीचे देखील वाटप करण्यात आले आहे वैद्यकीय विभागामार्फत विशेष कक्ष वाटपाच्या वेळी उभारण्यात आला होता.तसेच प्रत्येक मतदान पथकासोबत मतदान कर्मचारी याना उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून ORS ची पाकीट देखील पुरविण्यात आली आहे. सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे व तहसीलदार पाटण अनंत गुरव हे स्वतः कर्मचाऱ्यांमध्ये फिरून साहित्य वाटपाची माहिती घेत होते त्यांना आवश्यक त्या सूचना देत होते आलेल्या कर्मचारी यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत होते. साहित्य वाटपाचे पोलीस व महसूल विभागाने व्यवस्थित नियोजन केल्याने उन्हाची तीव्रता वाढण्या पूर्वीच सर्व मतदान पथके केंद्राकडे रवाना झाली आहे.त्यामुळे मतदान कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
सर्व मतदान यंत्रे साहित्य वाटपाच्या ठिकाणी आणणे ते झोन निहाय एकत्र करणे व त्याचे अचूक वाटप करणे याकामी नायब तहसीलदार पंडित पाटील, श्रीकांत शेंडे , मंडळ अधिकारी विलास गभाले, अव्वल कारकून सचिन थोरात, विनायक पाटील, संजय जंगम, अमोल कांबळे, तसेच सर्व तलाठी मंडळ अधिकारी व महसूल सहायक ,कोतवाल ,शिपाई कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.तसेच पोलीस विभागामार्फत पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून तालुक्यातील संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवणार आहेत.