पाटण तालुक्यात गृहभेटी द्वारे 232 दिव्यांग व वृद्ध मतदारांनी टपाली मतदानाद्वारे बजावला मतदानाचा हक्क: प्रांताधिकारी : सुनील गाढे

 

पाटण| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात सातारा लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेची एकूण तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून त्याचाच एक भाग म्हणून वृद्ध व दिव्यांग मतदार ज्यांना शारिरीक अक्षमता व अपंगत्वामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन समक्ष मतदान करता येणार नाही अशा मतदारांचे घरोघरी जाऊन टपाली मतदान करून घेणे बाबत निवडणूक आयोगाने यावेळी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण सातारा लोकसभा मतदार संघात 85 वर्षांवरील मतदार व दिव्याग मतदारांचे गृहभेटी द्वारे टपाली मतदान करून घेण्यात येत आहे.

पाटण तालुक्यात 85 वर्षांवरील अशा 253 वृद्ध व 24 दिव्यांग असे एकूण 277 मतदार यांनी त्यांना समक्ष केंद्रावर येऊन मतदान करणे अशक्य असल्याचे फॉर्म न 12 ड भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी याना कळविले होते. त्यानुसार याबाबत कागदपत्राची खात्री करून अशा मतदारांना टपाली मतदानाची सुविधा सहा निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुनील गाढे यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार पाटण तालुक्यात 1 मे व 2मे रोजी समक्ष घरी जाऊन मतदान करून घेणे कामी एकूण 12 पथकांची नियुक्ती केली असून प्रत्येक पथकात एक राजपत्रित अधिकारी हा मतदान अधिकारी असून समवेत इतर मतदान अधिकारी तसेच एक सूक्ष्म निरीक्षक व एक पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. सदर मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी संबंधित उमेदवार यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहू शकतात.

पाटण तालुक्यात टपाली मतदानासाठी वृद्ध व दिव्यांग मतदारांमध्ये उत्साह असून एकूण 277 पैकी सुमारे 232 व्यक्तींनी पहिल्या दिवशी गृह भेट टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

दिव्यांग व 85 वर्षांवरील वृद्ध मतदारांना यापूर्वी केंद्रावर जाऊन मतदान करताना अडचणी येत होत्या विशेषतः अपंगत्वामुळे किंवा वृद्धत्वा मुळे चालता फिरता न येणारे , बिछान्यावर पडून असलेले मतदार यांचे मतदान करून घेताना संबंधित कुटुंबाची दमछाक होत होती. त्यामुळे अशा काही दिव्यांग् व वृद्ध मतदारांचे मतदान यापूर्वी राहून जात होते ही बाब लक्षात घेऊन  

निवडणूक आयोगाने या वर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत अशा मतदारांना टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे संबंधित मतदार यांचेसह त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या सुविधेमुळे मुक्त व निर्भय मतदान प्रक्रियेसोबतच सर्व समावेशक मतदान प्रक्रिया हे जे अतिरिक्त उद्दिष्ट देण्यात आले आहे ते देखील साधण्यास यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत मदत होणार असून त्यामुळे मतदानाचा एकंदरीत टक्का देखील वाढण्यास मदत होणार आहे  

याशिवाय पाटण तालुक्यातील इतर सक्षम वृद्ध मतदार व दिव्याग मतदार जे समक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मतदान करणार आहेत त्यांचे संपूर्ण मतदान करून घेणे कामी यावेळी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी नमूद केले असून याबाबत तहसीलदार श्री अनंत गुरव व गट विकास अधिकारी श्री गोरख शेलार यांनी संयुक्तपणे तालुक्यासाठी एक आराखडा तयार केला असून त्यानुसार पाटण तालुक्यातील उर्वरित दिव्यागं व वृद्ध मतदारांचे मतदान संबंधित केंद्रावर पूर्ण करण्यावर भर राहील अशी माहिती सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे. 

पाटण तालुक्यातील निसरे येथील 91 वर्षाच्या मतदार श्रीमती विजयमाला दादासाहेब पाटील यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. निवडणूक कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घरी येऊन टपाली मतदान करून घेतल्यामुळे त्या खूप आनंदित झाल्या.कुटुंबातील सदस्यांनी देखील समाधान व्यक्त केले . श्रीमती पाटील यांनी पथकाशी बोलताना सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी नव मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले.

----------------------------------------------------------------------