लोकसभा निवडणूक प्रशिक्षणासाठी गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा :प्रांताधिकारी सुनील गाढे यांचा इशारा..

पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

पाटण लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पाटण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात येणारे कर्मचारी यांचे मतदान यंत्र हाताळणी व इतर अनुषगिक प्रशिक्षण सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांचे उपस्थितीत घेण्यात येत आहे . प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी एकूण 864 कर्मचारी याना बोलावण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाला 24 कर्मचारी अनुपस्थित राहिले आहेत त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांचा खुलासा तात्काळ मागविण्यात आला आहे.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशिक्षण घेण्यात आलेल्या कर्मचारी याना ऑनलाईन परीक्षा देणे आवश्यक असताना सुमारे 75 कर्मचारी हे सदर परीक्षा न देता परस्पर निघून गेल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांश शिक्षक कर्मचारी यांचा समावेश आहे. सदर बाब अतिशय गंभीर असल्याने या 75 कर्मचारी यांचा स्थानिक गट शिक्षण अधिकारी पाटण श्रीमती दीपा बोरकर यांचे मार्फत लेखी खुलासा मागविण्यात आला असून अनुपस्थित कर्मचारी याना बुधवारी 10/4/2024 रोजी सदर परीक्षेसाठी प्रांताधिकारी यांचे कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय 840 पैकी वर नमूद केलेले 75 कर्मचारी वगळता उर्वरित एकूण 765 कर्मचारी यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 744 कर्मचारी सदर परीक्षेत पात्र झाले असून 21 कर्मचारी सदर परीक्षेत अपात्र ठरले आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या 21 कर्मचारी यांनी देखील दि 10/4/2024 रोजी पुन्हा प्रशिक्षण घेण्यासाठी व त्यानंतर पुन्हा परीक्षा देण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोनदा प्रशिक्षण देऊनही सदर कर्मचारी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांचे विरुद्ध शिस्तभगाची कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिला आहे. निवडणुकीच्या कामात कोणतीही दिरंगाई अथवा दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही असेही पुढे सुनील गाढे यांनी नमूद केले आहे.त्यामुळे सर्व मतदान कर्मचारी यांनी निवडणूक विषयक सर्व कामे अचूक व नियमानुसार तसेच पारदर्शक रित्या पार पाडणे आवश्यक आहे.